ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:00 IST2018-11-12T23:59:22+5:302018-11-13T00:00:36+5:30

ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी उघडी राहत असल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी तासन्तास रांगेत ताटकळावे लागत आहेत़ रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे़

A single ticket window in the crowded season | ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी

ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी

ठळक मुद्देरेल्वेचे ढिसाळ नियोजन तिकीटासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने दिवाळीनिमित्त रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच याचबरोबर प्रवाशांच्या सुविधेसाठी इतर अनेक उपाययोजना करण्याची घोषणा हवेतच विरली असून ऐन गर्दीच्या हंगामात एकच तिकीट खिडकी उघडी राहत असल्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी तासन्तास रांगेत ताटकळावे लागत आहेत़ रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाबद्दल प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे़
दिवाळीनिमित्त बसस्थानक, रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी आहे़ दिवाळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता अनेक मार्गावरील रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याची घोषणा करण्यात आली होती़ परंतु अद्यापही ते जोडण्यात आले नाहीत़ त्यामुळे प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे़
रेल्वेचे आरक्षणही अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेवर आहे़ अनेक प्रवाशांनी तर दिवाळीसाठी चक्क तीन महिन्यांपूर्वी आरक्षण केले होते़ रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे अनेकांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले़ त्यात काही दिवसांपूर्वीच तिकीट घोटाळ्यात पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे़
त्यांच्या जागा रिक्तच आहे़ त्याचा परिणाम तिकीट खिडक्यांवर झाला़ ऐन गर्दीच्या हंगामात रेल्वेस्टेशनवर एकच तिकीट खिडकी उघडी ठेवण्यात आली होती़ त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी अनेक तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले़ त्याच दरम्यान, गाडी आल्याने नाईलाजाने अनेकांना विनातिकीट प्रवास करावा लागला़ रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांनी मात्र संताप व्यक्त केला़ दरम्यान, दिवाळीच्या सुट्ट्या आता संपल्या असून अनेकांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे़ त्यामुळेही गर्दीत वाढ होत आहे़

Web Title: A single ticket window in the crowded season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.