‘बंदूक दाखवू का!’ धमकावत दोघांचे मोबाइल, रोकड लुटली
By शिवराज बिचेवार | Updated: August 23, 2023 16:19 IST2023-08-23T16:18:32+5:302023-08-23T16:19:04+5:30
किनवट तालुक्यातील गोकुंदा शिवारातील घडली.

‘बंदूक दाखवू का!’ धमकावत दोघांचे मोबाइल, रोकड लुटली
नांदेड-घराचे बांधकाम पाहण्यासाठी दुचाकीवरुन जात असलेल्या शिक्षक व अन्य एकाला अडवून बंदूक दाखवू का म्हणून धमकाविण्यात आले. तसेच त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि दोन मोबाईल काढून घेण्यात आले. ही घटना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान किनवट तालुक्यातील गोकुंदा शिवारात घडली.
शिक्षक चंद्रशेखर विठ्ठलराव शेंडे व त्यांचे मित्र घराचे बांधकाम पाहण्यासाठी दुचाकीवरुन गंगाबेडी रस्त्यावरुन जात होते. त्याचवेळी मागाहून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. शेंडे यांना धमकावून त्यांच्या जवळील रोख ५ हजार रुपये आणि दोघांचेही मोबाईल काढून घेतले. यावेळी शेंडे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, बंदूक काढून दाखवू का? अशी धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि सावंत हे करीत आहेत.