धक्कादायक ! वापरलेल्या पीपीई कीट नांदेडमध्ये कचऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:20 IST2020-07-03T16:14:50+5:302020-07-03T16:20:06+5:30
रूग्णालय परिसरातील पीएम रूम शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत टाकला जातो़ या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वापरलेले मास्क, सलाईन, पीपीई कीट आढळून आल्या़

धक्कादायक ! वापरलेल्या पीपीई कीट नांदेडमध्ये कचऱ्यात
- श्रीनिवास भोसले
नांदेड : नांदेडसह शेजारील हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतून अत्यावश्यक सेवांसाठी नांदेडचे शासकीय रुग्णालय गाठणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना येथील घाणीचा सामना करावा लागत आहे़ शासकीय रुग्णालय परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वापरलेल्या पीपीई कीट, ओपीडी कीट, सलाईन व इतर औषधांच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या रूग्णालयामध्ये नांदेडसह परभणी, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो रूग्ण दररोज उपचारासाठी येतात़ परंतु, मागील काही दिवसांपासून शासकीय रूग्णालयातील रूग्णांना बाहेरून औषधी खरेदी करावी लागत असल्याच्या तक्रारीही रूग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत़ त्याचबरोबर परिसरात स्वच्छता नसल्याने डुकरांचा मुक्त संचार आहे़ ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरूवारी आढावा घेतला असता रूग्णालय इमारत आणि चहूबाजूंनी घाणीचे साम्राज्य होते़ रुग्णालयात ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी कुंड्या ठेवलेल्या आहेत़ परंतु, सदर कचरा रूग्णालय परिसरातील पीएम रूम शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत टाकला जातो़ या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात वापरलेले मास्क, सलाईन, पीपीई कीट आढळून आल्या़
योग्य ती कार्यवाही लवकरच करू
डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक ती औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे़ कोणी औषधी लिहून देत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल़ वापरलेल्या पीपीई कीट नष्ट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे़ स्वच्छतेचे काम खाजगी कंत्राटदारास दिले आहे. बाहेरील स्वच्छतेबाबत योग्य ती कार्यवाही लवकरच करू.
- डॉ़ चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय