प्रवाशांना धक्का! नांदेड विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:08 IST2025-08-22T12:08:00+5:302025-08-22T12:08:49+5:30
नांदेड विमानतळ अचानक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने प्रवाशांचे हाल

प्रवाशांना धक्का! नांदेड विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
नांदेड: शहरातील श्री गुरु गोविंद सिंघजी विमानतळ आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर मोठे खड्डे पडले असून, विमानांची वाहतूक सुरक्षित नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने हे विमानतळ बंद करण्यात आले आहे.
या अचानक झालेल्या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत, कारण हे विमानतळ नांदेडसोबतच लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, तसेच आदिलाबाद आणि निजामाबाद येथील लोकांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. नांदेडहून पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर आणि अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांसाठी नियमित विमानसेवा उपलब्ध होती.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण झाल्यावरच विमानसेवा पूर्ववत सुरू होईल. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. आधी नुकसानीचा अंदाज घेऊन निधीसाठी प्रस्ताव तयार केला जाईल, त्यानंतर निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण होईल आणि मगच प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू होईल. या प्रक्रियेतील विलंबामुळे विमानसेवा कधी सुरू होईल, याची सध्या कोणतीही निश्चिती नाही.