शेतात गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दगडाने ठेचून केला निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:28 IST2024-12-25T11:27:48+5:302024-12-25T11:28:34+5:30
तपासाचे पोलिसांसमोर आव्हान....

शेतात गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दगडाने ठेचून केला निर्घृण खून
कंधार (नांदेड) : तालुक्यातील दिग्रस बुद्रुक शेत शिवारात सुरेखा वैजनाथ शिंदे (वय ४० वर्षे) या महिलेचा दगडाने ठेचून निघृण खून झाल्याची घटना मंगळवार २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर या खुनाचा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
सदर महिला दुपारी एक वाजता घरून शेताकडे गेली असता परत न आल्यामुळे कुटुंबियांनी शेताकडे जाऊन शोध घेतला असता दगडाने चेहरा ठेचून निघृण खून झाल्याच्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील नागनाथ जोगपेटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, कंधार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, सुधाकर खंजे व पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. तसेच नांदेडचे ॲडिशनल एसपी सुरज गुरव, एलसीबीचे उदय खंडेराय आदी अधिकारी व पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. पंचनामा करून मृतदेह पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे दाखल करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून खून नेमका कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा अद्याप उलगडा झाला नाही. याबाबत कंधार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.