'मनोज जरांगे यांना दिल्ली नाही, थेट अमेरिकेलाच पाठवा'! लक्ष्मण हाके यांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:15 IST2025-09-19T19:14:58+5:302025-09-19T19:15:30+5:30
‘झुंड गोळा करून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकायचा आणि जीआर काढायला लावायचा, हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे.

'मनोज जरांगे यांना दिल्ली नाही, थेट अमेरिकेलाच पाठवा'! लक्ष्मण हाके यांची खोचक टीका
नांदेड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा वातावरण तापले असून, मनोज जरांगे-पाटील यांच्या दिल्ली जाण्याच्या इशाऱ्यावर ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘जरांगे यांनी दिल्ली नव्हे तर अमेरिकेलाच जावे, सरकारने त्यांना तिथे नोकरी शोधून द्यावी आणि दोन-तीन वर्षे तिकडेच ठेवावे,’ अशी उपरोधिक मागणी करत हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली.
नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता प्रा. हाके यांनी सिडको परिसरात एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हाके म्हणाले, ‘झुंड गोळा करून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकायचा आणि जीआर काढायला लावायचा, हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे. गावागावांत ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसींच्या अन्नात माती कालवली जात आहे. हे थांबायला हवे. हैदराबाद गॅझेट जर मराठा समाजासाठी लागू होऊ शकते, तर बंजारा समाजालाही आरक्षण मिळायला हवे,’ असेही प्रा. हाके म्हणाले.
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच
आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभर गावागावात उसळलेल्या ओबीसी–मराठा संघर्षावरही प्रा. लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जोपर्यंत सरकारचा विवादित जीआर मागे घेतला जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.” हाके पुढे म्हणाले की, हैदराबाद गॅझेट मराठा समाजावर लागू होत असेल, तर त्याच न्यायाने बंजारा समाजालाही आरक्षणाचा लाभ मिळायला हवा. त्यांनी स्पष्ट केले की या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.