सातबाऱ्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा लढा; जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सकारात्मक साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:57 IST2024-12-31T18:55:05+5:302024-12-31T18:57:15+5:30

जिद्दी शेतकऱ्याची कहाणी; तब्बल ४५ वर्षानंतर मिळाला हक्काचा सातबारा

Seeing the farmer's stubbornness, the government system moved; After 45 years, the farmer got his rights and name on 7/12 | सातबाऱ्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा लढा; जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सकारात्मक साथ

सातबाऱ्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा लढा; जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सकारात्मक साथ

मुदखेड (नांदेड) : सरकारी काम कार्यालयात अनेक खेटे मारल्याशिवाय होत नाही असा अनेकांना अनुभव आला असेल. असाच अनुभव मुदखेड तालुक्यातील मौजे डोणगाव येथील शेतकऱ्यांना आला आहे. शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार या शेतकऱ्यांना शेत जमिनीचा ७/१२ एक-दोन वर्ष नाही तर तब्बल ४५ वर्षांनंतर मिळाला आहे.

तालुक्यातील मौजे डोणगाव येथील शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांनी १९७९ मध्ये गावातीलच सर्वे क्र. ७३ मधील १ हेक्टर २१ आर जमीन विठ्ठल मरिबा यांचेकडून विकत घेतली. त्यानंतर एकत्रिकरण योजनेमध्‍ये याचा गट क्रमांक बदलून १९६ झाला. यानुसार कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांचा अंमल ७/१२ होणे गरजेचे होते. परंतु त्‍याठिकाणी तत्‍कालीन तलाठी यांनी दुसऱ्याच व्‍यक्‍तीच्या नावे अंमल केला. त्या व्‍यक्‍तीची जमीन जुना सर्वे क्र. ६८ व गट क्र.१८४ मध्‍ये होती. सदर गट क्र.१८४ हा एकत्रिकरण योजनेनंतर झाला परंतु त्‍याची ७/१२ तयार केली नाही. यामुळे शेतकरी कनिराम गोमा पवार व सोमा धनजी पवार यांनी सातबारा नावे होण्यासाठी अर्ज केला. मात्र त्याचा अंमल झाला नाही.
 
मात्र, हार न मानता अर्जदार शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष तहसिल कार्यालय आणि उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयात ७/१२ मिळण्यासाठी चकरा मारल्या. दरम्यान, महसूलचे नायब तहसिलदार मारोतराव जगताप यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी सखोल चौकशी करत जुने अभिलेख तपासणी केली. तसेच प्रत्‍यक्ष जागेवर उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयातील प्रतिनिधीसह भेट देऊन शहानिशा केली. त्यानंतर महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ खाली दिनांक ०८/०२/२०२४ रोजी प्रकरणात निकाल दिला. 

जिद्दी शेतकऱ्यास यंदा सरकारी यंत्रणेची सक्रिय साथ
त्यानंतर आज, मंगळवारी तहसिलदार आनंद देऊळगाकर यांच्या हस्‍ते शेतकऱ्यास त्‍यांचा ७/१२ देण्यात आला. शेतकऱ्याने तब्‍बल ४५ वर्षानंतर ७/१२ मिळाल्‍याबद्दल तहसिलदार व नायब तहसिलदार यांचे आभार व्‍यक्‍त केले. महसूलचे उल्‍हास जवळेकर, शाम चौधरी, तलाठी गड्डमवार, बोधमवाड, गोपाल माने, मंडळ अधिकारी हायुन पठाण, विकास कदम आदि कर्मचारी अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी दूर केल्या. जिद्दी शेतकऱ्यांना सरकारी यंत्रणेची यंदा सकारात्मक साथ लाभल्याने तब्बल ४५ वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Seeing the farmer's stubbornness, the government system moved; After 45 years, the farmer got his rights and name on 7/12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.