खरिपाची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिकच; अंतिम आणेवारीत नुकसानीची दखल घेतली जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:14 IST2020-10-16T17:13:14+5:302020-10-16T17:14:03+5:30
Rain Hits Nanded District जिल्ह्यात ८ लाख ४२ हजार ६५४.५९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.

खरिपाची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिकच; अंतिम आणेवारीत नुकसानीची दखल घेतली जाण्याची शक्यता
नांदेड : जिल्ह्यात खरीप पीकांची हंगामी पैसेवारी महसूल विभागाने घोषित केली असून संपूर्ण १५६२ गावामध्ये पैसेवारीही ५० पैशापेक्षा अधिक आली आहे. त्यामुळे पीकांची परिस्थिती चांगली असल्याचे स्पष्ट हेात आहे. पण त्याचवेळी अतिवृष्टीचा मोठा फटकाही जिल्ह्यातील खरीप पीकांना बसला आहे.
जिल्ह्यात ८ लाख ४२ हजार ६५४.५९ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील ७ लाख ८४ हजार ९१३.५ हेक्टर क्षेत्र खरीपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ३२ हजार ४८३.५१ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले आहे. महसूल विभागाने सप्टेंबर अखेरीस खरीपाची हंगमाी पैसेवारी घोषित केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक पैसेवारी ही हिमायतनगर तालुक्यातील आली आहे. ६३ पैसे येथे हंगमाी पैसेवारी आहे. नांदेड तालुक्यात ५६ पैसे, अर्धापूर ५५, कंधार ५३, लोहा ५९, भोकर ५९, मुदखेड ६०, हदगाव ५४, किनवट ५५, माहूर ५५, देगलूर ५५, मुखेड ५४, बिलोली ५४, नायगाव ५८, धर्माबाद ५४, आणि उमरी तालुक्यातही पैसेवारी ६० घोषित केली आहे. पहिल्या टप्यात पावसाने साथ दिल्याने पीकांची वाढ समाधानकारक होती. ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि चांगली असलेली सूगी शेतकर्यांच्या हातून गेल्यात जमा आहे. ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद आदी पीकांना फटका बसला आहे. त्याचवेळी फळबागा व फळपीकांचेही नुकसान झाले आहे. रबी हंगामाच्या पेरणीलाही पावसामुळे विलंब होत आहे.
खरीपाची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. दुष्काळ जिल्ह्यात १ हजार ५६२ गावातील पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक १९१ गावे किनवट तालुक्यातील आहेत. मुखेड १३५, देगलर १०८, हदगाव १३७, कंधार १२६, लोहा १२७, नांदेड ८८, अर्धापूर ६४, मुदखेड ५५, हिमायतनगर ६४, माहूर ९२, बिलोली ९१, नायगाव ८९, उमरी ६२, आणि धर्माबाद तालुक्यातील ५७ गावांचा समावेश आहे. अथवा अन्य बाबींचा निर्णय हा अंतिम पैसेवारीच घेतला जातो. ही अंतिम पैसेवारी आता अतिवृष्टीच्या नुकसानीची दखल कितपत घेते याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
ओल्या दुष्काळाची मागणी
जिल्ह्यात साडेतीन लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात पावसामुळे पीकांचे नुकसान ३३ टक्क्याहून अधिक झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला पसंती दिली होती. मात्र जिल्ह्यात अतिवृष्टी व पावसाचा मोठा फटका याच दोन पीकांना बसला आहे. काढणीस आलेले पीक मातीमोल झालेले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना नजर आणेवारीही ५० पैशापेक्षा अधिक आली आहे.