आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:00 IST2025-07-03T16:53:05+5:302025-07-03T17:00:02+5:30

हिमायतनगर तालुक्यातील दोन गावांतील प्रकार, अन्यायकारक आरक्षण बदलण्याची मागणी

Sarpanch reservation for OBCs in tribal-dominated villages; There is not a single OBC, who is the candidate? | आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला?

आदिवासीबहुल गावात चक्क ओबीसीला सरपंच आरक्षण; एकही ओबीसी नाही, उमेदवारी कोणाला?

हिमायतनगर (जि. नांदेड): तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी नव्या शासन निर्णयानुसार सरपंचपदासाठी आरक्षण सोडत करण्यात आली. यामध्ये शंभर टक्के आदिवासीबहुल गाव असलेल्या चिंचोर्डीत ओबीसीचे एकही घर नाही. मात्र, तरीही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण चक्क ओबीसी प्रवर्गासाठी सुटल्याने ग्रामस्थांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे आरक्षण तत्काळ बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात इतर जातीचा किंवा प्रवर्गाचा एकही व्यक्ती वास्तव्यास नाही. त्यात मंगळवारी झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत चिंचोर्डी येथील सरपंचपदाचे आरक्षण ओबीसीला सोडण्यात आले. चिंचोर्डी गावात ओबीसीचे एकही घर नसल्याने सरपंचपदासाठी काय बाहेर गावचा उमेदवार उभा करावा की काय, असा सवाल आता ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे गावात ओबीसीचा उमेदवारच नसल्याने आरक्षण बदलून मिळणार की, कायम राहाणार हे लवकर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गावातील एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांच्या भेटीला जाणार असल्याचे चिंचोर्डी येथील सरपंच गंगाराम ढोले, ग्रा. पं. सदस्य संदीप झळके यांनी सांगितले आहे.

महादापूरलाही एकच घर, तरी...
चिंचोडीप्रमाणे तालुक्यातील महादापूर हे गावदेखील आदिवासीबहुल गाव असून, येथे ओबीसी प्रवर्गाचे एकच घर आहे. असे असतानाही सरपंचपदाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव ठेवले आहे. या प्रकारामुळे आदिवासीबहुल गावात प्रशासनाने केलेल्या सरपंच सोडतीच्या आरक्षणविरोधात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत झालेल्या गोंधळामुळे आदिवासींवर मोठा अन्याय झाला असून, यात प्रशासनाने योग्य तो बदल करून एसटी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Sarpanch reservation for OBCs in tribal-dominated villages; There is not a single OBC, who is the candidate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.