मस्साजोग हत्या प्रकरण; कपाळापासून ते घोट्यापर्यंत मुकामार, अंतर्गत रक्तस्त्रावाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:44 IST2024-12-13T11:43:21+5:302024-12-13T11:44:52+5:30
शवविच्छेदन अहवालातील प्राथमिक माहिती समोर

मस्साजोग हत्या प्रकरण; कपाळापासून ते घोट्यापर्यंत मुकामार, अंतर्गत रक्तस्त्रावाने मृत्यू
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे प्राथमिक कारण समोर आले आहे. यामध्ये आरोपींनी सरपंचाला वाहनातच कपाळापासून ते घोट्यापर्यंत वायररोपने आणि बुक्क्यांनी मुकामार दिला. त्यामुळे वरून जखम दिसत नसली तरी डोक्यात, फुफ्फुसासह यकृत आणि इतर अवयवयांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला. यामुळेच सरपंचाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून हत्या केली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (तिघेही, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर) यांचा आरोपी म्हणून सहभाग आढळला आहे. यातील जयराम, महेश आणि प्रतीक हे तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. परंतु, यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर चार आरोपी अजूनही मोकाटच आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह वेगवेगळी पाच ते सहा पथके रवाना झालेली आहेत. तसेच याच प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, देशमुख कुटुंबीयांच्या भेटीसाठी सत्ताधारी, विरोधक जात आहेत. त्यांच्याकडून आरोपींचा शोध घेऊन कडक शासन करण्याची मागणी केली जात आहे. शिवाय पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड शोधणे, विशेष यंत्रणेमार्फत तपास करणे, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. सध्यातरी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.
आरोपींना कठोर शासन व्हावे - धनंजय मुंडे
संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी व गंभीर स्वरूपाचे आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी ही समाजविघातक असून, अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे. यासाठी या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे. देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, असे आ. धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरूवारी पत्र पाठवले आहे.
अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानेच मृत्यू
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत शवविच्छेदन करण्यात आले होते. यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यानेच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. याचा सखोल अभ्यास केला जात आहे.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड