ट्रक येत असल्याने घाई केली, लोखंडी शिडी थेट विद्युत वाहिनीला चिकटली, तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:32 IST2025-10-27T18:29:48+5:302025-10-27T18:32:38+5:30
यावेळी दोघे गंभीर जखमी झाले आहेत

ट्रक येत असल्याने घाई केली, लोखंडी शिडी थेट विद्युत वाहिनीला चिकटली, तरुणाचा मृत्यू
- गोविंद कदम
लोहा: तालुक्यातील कारेगाव येथे सोमवारी दुपारी सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत लोखंडी सीडी विद्युत वाहिनीला चिटकल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील गुरुद्वारा परिसरातून एम.एच. २६ वॉटर पार्ककडे लोखंडी सीडी घेऊन जाण्यात येत होती. मात्र, ही सीडी वरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीला लागल्याने विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला. या अपघातात गजानन भुस्कुटे (वय २०, रा. शेकापूर, ता. कंधार) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन साथीदार गंभीर जखमी झाले.जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनेच्या वेळी नांदेडकडून भरधाव वेगात ट्रक येत असल्याचे दिसल्याने घाईघाईत सीडी हलविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने वीजपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला.या प्रकरणी सोनखेड पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.