Video: आरपीएफ जवान देवासारखा धावला; युवक रेल्वेखाली जाणार तोच ओढून जीव वाचवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 15:29 IST2022-06-08T15:25:49+5:302022-06-08T15:29:33+5:30
कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान संदीप गोवंदे यांनी प्रसंगावधान राखत दोन्ही हाताने प्रवाशाला बाहेर ओढले.

Video: आरपीएफ जवान देवासारखा धावला; युवक रेल्वेखाली जाणार तोच ओढून जीव वाचवला
नांदेड- रात्रीच्या वेळी फलाटावरुन निघालेली रेल्वे पकडण्याच्या नादात तोल जावून पडल्याने रेल्वेखाली जात असलेल्या एका प्रवाशाचे प्राण आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नांदेड रेल्वेस्टेशनवर घडली. हा सर्व थरार सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी प्रवाशांनी आरपीएफ जवानाचे कौतुक केले.
मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास धनबादहून कोल्हापूरकडे जात असलेल्या एक्सप्रेस काही मिनिटे नांदेड रेल्वेस्टेशनच्या फलाट क्रमांक २ वर थांबली होती. यावेळी गाडीतून दोघे जण जेवण घेण्यासाठी उतरले. जेवणाचे पार्सल घेवून परत येत असताना अचानक रेल्वे निघाली. त्यानंतर धावती रेल्वे पकडण्यासाठी दोन्ही प्रवाशी फलाटावरुन धावत होते. यावेळी एकजण डब्यात चढला. तर दुसरा चढत असताना पाय घसरुन खाली पडला.
रेल्वेखाली येणार तोच आरपीएफ जवानाने ओढले...नांदेड रेल्वेस्टेशनवर थरार#nandedpic.twitter.com/od9mpyXaaE
— Lokmat (@lokmat) June 8, 2022
तो रेल्वेखाली जात असतानाच कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान संदीप गोवंदे यांनी प्रसंगावधान राखत दोन्ही हाताने या प्रवाशाला बाहेर ओढले. त्यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले. त्यानंतर चैन ओढून ही गाडी थांबविण्यात आली. त्यानंतर या प्रवाशाला रेल्वेत बसविण्यात आले. प्रवाशाने प्राण वाचविल्याबद्दल गोवंदे यांचे आभार मानले. ही सर्व थरारक घटना सीसी टिव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.