महसूल कर्मचाऱ्यास रेती माफियांची धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:38 IST2019-02-08T00:37:17+5:302019-02-08T00:38:30+5:30
महसूल कर्मचारी आणि अवैधरेती उपसा करणा-यांमध्ये संघर्षाच्या घटना अनेक ठिकाणी दिसून येतात. असाच प्रकार देगलूर तालुक्यातील शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर घडला.

महसूल कर्मचाऱ्यास रेती माफियांची धक्काबुक्की
नांदेड : महसूल कर्मचारी आणि अवैधरेती उपसा करणा-यांमध्ये संघर्षाच्या घटना अनेक ठिकाणी दिसून येतात. असाच प्रकार देगलूर तालुक्यातील शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर घडला. अवैध रेती उपसा थांबवण्यासाठी गस्त घालणा-या देगलूर तहसीलच्या वाहनचालकास रेती माफियांनी धक्काबुक्की करुन वाळूचे ट्रॅक्टर घेवून पळ काढला. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू उपशाच्या तक्रारी वाढल्यानंतर देगलूर येथील तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, माधव बाबुराव होनरावळे हे तहसील कार्यालयातील चालक शहापूर ते वन्नाळी या रस्त्यावर गस्त करीत होते. यावेळी त्यांना रेती घेऊन जाणारे दोन ट्रॅक्टर आढळून आले. या ट्रॅक्टर चालकांना थांबवून होनरावळे यांनी तुम्ही या वाळुची रॉयल्टी भरली आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी सदर ट्रॅक्टरचालकाकडे रॉयल्टी नसल्याची बाब पुढे आली.
त्यामुळे होनरावळे यांनी दोन्ही चालकांना वाळूचे ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेत असताना रेतीमाफियांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना धक्काबुक्की करुन एक ट्रॅक्टर घेवून पळून गेले. या प्रकरणी माधव होनरावळे यांच्या तक्रारीवरुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.