नांदेड : बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याने एका सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीवर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे २८ लाख, ७४ हजार १४६ रुपये किमतीच्या मालमत्ता कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत १६.६५ टक्के जास्त असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.
सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार (रा. आमदारनगर) यांनी त्यांच्या सेवाकाळात भ्रष्टाचार करून तसेच लाच घेऊन अपसंपदा गोळा केल्याची तक्रार नांदेडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्यानुसार लोकसेवक संजय पुजलवार यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली. पुजलवार यांनी संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली; परंतु त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत.
त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता स्वतःचे नावे, त्यांची पत्नी मनीषा संजय पुजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. त्यांनी संपादित केलेली २८,७४,१४६ रुपये किमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत अधिक असल्याचे निष्पन्न झाले. या विसंगत बेहिशेबी मालमत्ता संपादित करण्यासाठी लोकसेवक संजय पुजलवार यांना त्यांची पत्नी मनीषा पुजलवार यांनी मदत करून गुन्ह्यास प्रोत्साहन देत अपप्रेरणा दिल्यामुळे दोघांवरही भाग्यनगर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.