पत्नीला परत पाठविण्यास नकार, संतप्त जावयाने केला सासूचा गळा कापून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 20:01 IST2024-12-12T19:57:50+5:302024-12-12T20:01:58+5:30
सासूबाईने मुलीस पाठविण्यास नकार दिल्याने जावई रिकाम्या हाताने परत गेला. पण तो पुन्हा आला अन्

पत्नीला परत पाठविण्यास नकार, संतप्त जावयाने केला सासूचा गळा कापून खून
नरसी फाटा : पत्नीला परत का पाठवत नाहीस, असे म्हणून जावयाने सासुरवाडीत येऊन घरासमोर बसलेल्या सासूचा खंजीरने गळा कापून निर्घृण खून केला. ही घटना नरसी येथील बजरंगनगरात ११ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. खून करणाऱ्या जावयासह अन्य एकास रामतीर्थ पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले आहे.
नरसी येथील बजरंगनगरातील वडार गल्लीत राहत असलेल्या लक्ष्मण रॅपनवाड यांची मुलगी उज्ज्वला हिचे नांदेड येथील तरोडा खु. येथे राहणारा अशोक किशन धोत्रे यांच्यासोबत लग्न झाले. मागील एक वर्षापासून पती अशोक हा सतत मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने उज्ज्वलाची आई पारूबाई लक्ष्मण रॅपनवाड यांनी मुलीसह तिच्या दोन अपत्यांना नरसी येथे माहेरी घेऊन आली होती. पती अशोक धोत्रे हा पत्नीला नांदावयास पाठवा म्हणून घेऊन जाण्यासाठी आठ दिवसांपूर्वी नरसी येथे आला होता. पण सासू पारूबाई हिने मुलीस पाठविण्यास नकार दिल्याने रिकाम्या हाताने परत गेला.
दरम्यान, अशोक हा ११ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर दुसऱ्या एकाला सोबत घेऊन नरसीत आला. दारूच्या नशेत असलेल्या अशोकने घरासमोर अंगणात बसलेल्या सासू पारूबाई यांच्यासोबत वाद घातला. या वादात अशोकने खंजीरने पारूबाईचा गळा कापून निर्घृण खून केला. गल्लीतील काही लोकांनी घटनेची माहिती रामतीर्थ पोलिसांना देताच पोहेकाॅ अनिल रंदकवाले व संजय शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. सपोनि श्रीधर जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी अशोक किशन धोत्रे व त्याच्या साथीदारास ताब्यात घेऊन अटक केली. अतिरिक्त पोलिस अधिकारी सूरज गुरव यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
...तर त्यांनाही संपवेल
अशोकने सासूचा गळा चिरून खून केल्यानंतर आरडाओरडा करत ‘कोण जवळ येते, कोण साथ देते, त्यांनाही अशाच प्रकारे संपवतो,’ असे म्हणून दहशत निर्माण केली होती. घरात पत्नी, पारूबाईची सून, हे दोघे होते. सून बाहेर येताच तिचाही अशोकने पाठलाग केला. मात्र, घराचे गेट बंद करून घेतल्याने जीव वाचला, अशी आपबीती परिसरातील महिलांनी सांगितली. मयत पारूबाई रॅपनवाड यांच्या पश्चात पती, पाच मुली, दोन मुले, असा परिवार आहे.