नांदेड शहरात गेल्या काही दिवसांत बॅग पळविण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भर दिवसा चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून बॅग लंपास करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोमेश कॉलनी भागातील गणेश उत्तम पतंगे हा युवक शिवाजीनगर ठाण्यात आला होता. हिंगोली गेट भागात सकाळी साडेनऊ वाजता चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून आपल्याजवळील साडेआठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी तातडीने शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. पो. नि. अनंत नरुटे, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, अभिमन्यू सोळंके, संजय ननवरे या पोलीस निरीक्षकांची फौज रस्त्यावर उतरली होती. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही शिवाजीनगर ठाण्यात येऊन धडकले. पो.नि. द्वारकादास चिखलीकर यांनी पतंगे यांची उलटतपासणी केली. त्यात देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे बनाव रचल्याचे उघडकीस आले. तसेच रकमेतील ३ लाख २० हजार रुपये बँकेत भरले, ५० हजार रुपये नारळपाणी विक्रेत्याला दिले आणि २ लाख ५० हजार घरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडे खोटी तक्रार दिल्याचे प्रकरण पतंगे यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.
देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडेआठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST