Pranayama, Yoga | प्राणायाम, योगसाधनेची रंगीत तालीम

प्राणायाम, योगसाधनेची रंगीत तालीम

ठळक मुद्देराज्यस्तरीय कार्यक्रमास रामदेवबाबांची प्रमुख उपस्थिती

नांदेड : योगऋषी स्वामी रामदेवबाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक), असर्जन येथील मैदानावर १८ जून रोजी पहाटे ५ वाजता योग साधनेची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी प्राणायाम व योगसाधनेचा सराव केला.
याप्रसंगी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, लेखाधिकारी निलकंठ पाचंगे, राजेश पवार, जि. प. सदस्या पूनम पवार, मिलिंद देशमुख, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती. यावेळी सामान्य योग, शिथिलीकरण आसन, उभे राहून करण्यात येणारे ताडासन, पादहस्तानसन, अद्धचक्रासन, त्रिकोणासन तर बसून करण्यात येणाऱ्या आसनामध्ये दण्डासन, भद्रासन, वीरासन, उद्ध अष्ट्रासन, शशकासन, उत्तानमंडूकासन, वक्रासन, उत्तनमंडूकासन, पोटावर झोपून करावयाचे आसनामध्ये मकरासन, भुजंगासन, शलभासन तसेच पाठीवर झोपून करण्यात येणाºया आसनामध्ये सेतूबंध आसन, अत्तानपाद आसन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, श्वासन, योग निद्रा त्याचप्रमाणे प्राणायामामध्ये कपालभारती, अनुलोमविलोम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व ध्यान अशा सात प्रकारांतील विविध आसने व प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी विविध कार्यालयांचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पतंजली योग समितीचे सदस्य, पत्रकार, महिला व पुरुष यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. गुरुवार, २० जून रोजी पहाटे साडेचार वाजता पुन्हा एकदा रंगीत तालीम याच मैदानावर घेण्यात येणार आहे.
सुस्थितीत कार्यक्रम पार पाडावा- खा. चिखलीकर
योगऋषी स्वामी रामदेव बाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबीर घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. आज शिवरत्न जिवाजी महाले मैदान असर्जन येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनानिमित्त घेण्यात येणाºया शिबिर पूर्वतयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जि.प. सदस्य तथा माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, चैतन्यबापू देशमुख, मिलिंद देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कोंडेकर, यू.डी. इंगोले, एस.व्ही. शिंगणे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कुंडगीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. २१ जून रोजी अधिकारी, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, गावकरी, महिला बचत गटातील सदस्य, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक तसेच महिला व पुरुषांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

Web Title: Pranayama, Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.