कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; मराठवाड्याला पुन्हा 'लाल दिवा' मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:04 IST2025-12-20T12:03:34+5:302025-12-20T12:04:35+5:30
मराठवाड्याला मंत्रिपदाचे वेध; आमदार चिखलीकर, नवघरे, विटेकर चर्चेत; नवतरुण चेहरा म्हणून नवघरे आघाडीवर

कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत हालचालींना वेग; मराठवाड्याला पुन्हा 'लाल दिवा' मिळणार?
- श्रीनिवास भोसले
नांदेड : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे मंत्रिमंडळातील रिक्त जागेवर मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राजू नवघरे आणि आमदार राजेश विटेकर यांच्यापैकी कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मराठवाड्यात विधानसभेच्या आठ जागांवर यश मिळाले होते. यामध्ये धनंजय मुंडे - परळी, विजयसिंह पंडित - गेवराई, प्रकाश सोळंके - माजलगाव, प्रतापराव चिखलीकर - लोहा, राजेश विटेकर - पाथरी, राजू (चंद्रकांत) नवघरे - वसमत, संजय बनसोडे -उदगीर आणि बाबासाहेब पाटील - अहमदपूर यांचा समावेश आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग समोर आल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मराठवाड्याला पुन्हा मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यातच आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही राजीनामा दिल्याने मराठवाड्यातील आमदारांसह अजितदादांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेले हे राजीनामा-नाट्य राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर परिणाम करू शकते. त्यामुळे ‘डॅमेज कंट्रोल’साठी अजित पवार गटाकडून नव्या चेहऱ्याला मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पूर्व मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना यापूर्वीपासूनच नागरिकांमध्ये आहे. आमदार चिखलीकर, आमदार नवघरे आणि आमदार विटेकर यांची नावे चर्चेत असली तरी परभणी जिल्ह्याला भाजपकडून आधीच मंत्रिपद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कोट्यातून नांदेड किंवा हिंगोली जिल्ह्याला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.
नांदेड आणि हिंगोलीवर अन्याय का?
नांदेड जिल्ह्याने विधानसभेत शंभर टक्के स्ट्राइक रेट साधला असतानाही भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी या महायुतीतील कोणत्याही पक्षाने नांदेडला मंत्रिपद दिलेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या काळात सातत्याने मंत्रिपद लाभलेल्या नांदेडवर महायुती सरकारच्या काळात अन्याय झाल्याची भावना तीव्र आहे. भाजपचे पाच, शिंदे शिवसेनेचे चार आणि राष्ट्रवादीचा एक आमदार असूनही नांदेडला सत्ताधाऱ्यांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार राजू नवघरे हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले, नवतरुण आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. आता मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मराठवाड्यावरील हा अन्याय दूर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
शिवसेनेकडूनही मराठवाड्याकडे दुर्लक्षच
मराठवाड्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम असल्याचे सांगितले जाते. मात्र, मंत्रिपद वाटपात मराठवाड्याला अपेक्षित स्थान मिळालेले नाही. नांदेडमधून आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजीराव कल्याणकर यांची नावे आघाडीवर होती. हेमंत पाटील यांना तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी मुंबईला पाचारणही करण्यात आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी नांदेडची संधी हुकली. आजघडीला फेरबदलाची चर्चा असताना पुन्हा आमदार पाटील यांच्यासह बालाजी कल्याणकर आणि आमदार संतोष बांगर यांचे नाव चर्चेत आले आहे.