पंधराशे लोकसंख्येच्या सावळेश्वरमध्ये १५ हजारांवर जन्म-मृत्यू नोंदी; CRS घोटाळ्याने नांदेडमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:59 IST2026-02-05T13:58:46+5:302026-02-05T13:59:42+5:30
परराज्यातील नागरिकांच्या नोंदींचा संशय; नांदेडच्या सावळेश्वरमध्ये मोठा 'डिजिटल घोटाळा' उघड

पंधराशे लोकसंख्येच्या सावळेश्वरमध्ये १५ हजारांवर जन्म-मृत्यू नोंदी; CRS घोटाळ्याने नांदेडमध्ये खळबळ
- गोविंद शिंदे
बारूळ (जि.नांदेड) : कंधार तालुक्यातील सावळेश्वर या गावाची सन २०११ जनगणनेनुसार लोकसंख्या सुमारे १५०० असताना, सन २०२५ मध्ये ‘ॲड ओल्ड इव्हेंट’ (विलंबित जन्म-मृत्यू नोंदी) अंतर्गत तब्बल १५ हजार ५७० नोंदी झाल्याचे समोर आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या मोठी असल्याने ‘सीआरएस’ प्रणालीतील नोंदी संशयाच्या भोवऱ्यात आढळल्या आहेत. यासंदर्भाने तालुकास्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पुणे येथील जन्म-मृत्यू निबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या नोंदी केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस) पोर्टलवर केल्या आहेत. एका ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदी कशा झाल्या, याबाब माहिती संकलन सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार या नोंदींमध्ये झारखंड, उत्तराखंड तसेच उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील नागरिकांच्या नोंदी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही.
नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात जन्म-मृत्यू नोंदी करून दिल्या जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सावळेश्वरमधील नोंदींचीही सखोल तपासणी करण्यात येत आहे. याच प्रकारचे संशयास्पद नोंदीचे प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातील सेंदूर, सनी, भवानी तसेच जळगाव जिल्ह्यातील रताळे येथे समोर आले असल्याने, या सर्व प्रकरणांचा परस्पर संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कंधारचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
काय म्हणतात, गावचे ग्रामसेवक
ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकसंख्या १ हजार ६६६ आहे. सीआरएस प्रणालीवर सध्या १५ हजार ५७० लोकसंख्या दिसत आहे. त्यातील नोंदीपैकी माझ्याकडून केवळ एकाच व्यक्तीची जन्मनोंद करण्यात आली असून, तिही तहसीलदारांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. उर्वरित नोंदीबाबत संशय असून, त्यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिली जात आहे. चौकशी सुरू आहे.
- भावना कावळे, ग्रामसेविका, सावळेश्वर
तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज
प्राथमिक तपासात सीआरएस व ई-ग्राम स्वराज्य प्रणालीवरील यूजर आयडी व पासवर्डचा गैरवापर झाल्याची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे. नेमक्या कोणत्या कालावधीत व कोणाच्या लॉगिनद्वारे या नोंदी करण्यात आल्या, याचा तांत्रिक तपास सुरू आहे.