'ओपन-क्लोज'अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन खुलेआम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 08:31 PM2020-01-13T20:31:56+5:302020-01-13T20:34:47+5:30

दररोज होते लाखो रुपयांची उलाढाल

'open-close'; illegal matka lottery runs openly in Nanded | 'ओपन-क्लोज'अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन खुलेआम

'ओपन-क्लोज'अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन खुलेआम

googlenewsNext
ठळक मुद्देमटकाबुकींनी थाटली खुलेआम दुकानेपोलिसांकडून मात्र कारवाईचे सोपस्कार

- शिवराज बिचेवार

नांदेड : राजकीय वरदहस्त, हप्ता संस्कृती, अनेक ठिकाणी यंत्रणेकडून होणारी मांडवली यामुळे जिल्ह्यात अवैध इमानदारीचे ओपन-क्लोज खुलेआम सुरू आहेत़ मटकाबुकी शिरजोर झाले असून गजबजलेल्या वस्त्यांमध्ये त्यांनी कल्याण-मिलनची दुकाने थाटली आहेत़ 

मटक्यामुळे अनेकांचे खिसे गरम होत असले तरी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मटक्याचे व्यसन लागलेले गोरगरीब मात्र आपले सर्वस्व गमावून बसतात़ पूर्वी चिठ्ठ्यांवर आकड्यांचा हा खेळ चालत होता़ परंतु आता मोबाईलच्या जमान्यात बुकी आणि जुगारी दोघेही हायटेक झाले असून मोबाईलवर मेसेजद्वारे हा जुगार खेळला जात आहे़ शहरातील प्रत्येक भागात खुलेआम आकडे घेण्यासाठी दुकाने थाटण्यात आली आहेत़ 

शहरात आजघडीला ५०० हून अधिक मटकाबुकी आहेत़ तर त्यांच्या हाताखाली हजारो बेरोजगार तरूण आकड्यांच्या या खेळात अडकले आहेत़ आता तर महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थीही आकड्यांच्या गोष्टी करत आहेत़ गल्लीबोळात  याच आकड्यांच्या खेळामुळे अनेकवेळा कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे़ शहरातील गणेशनगर, छत्रपती चौक, कलामंदिर, सराफा, जुना मोंढा, देगलूर नाका, बाफना, शिवाजीनगर, नवी आबादी, भाग्यनगर, महाराणा प्रतापसिंघ चौक, वजिराबाद, पावडेवाडी, तरोडा नाका आदी ठिकाणी खुलेआम मटका सुरू आहे़ या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांना दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मजुरी दिली जाते़ दबाव वाढल्यानंतर पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जाते़ त्यात पंटरच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात येतात़ मात्र मुख्य सूत्रधार नामानिराळाचा राहतो़ त्यानंतर काही दिवस हे अड्डे बंद राहतात़ परंतु थोड्याच दिवसानंतर पुन्हा नव्या जोमाने मटका बुकी कामाला लागतात़ अशाप्रकारे अवैध इमानदारीचा हा खेळ जिल्ह्यात खुलेआम सुरु आहे़ 

महिलाही उतरल्या आकड्याच्या खेळात
जुगार हे पुरुषप्रधान व्यसन आहे़ परंतु मटका या जुगारात आता स्त्रियाही उतरल्या आहेत़ जुन्या नांदेडातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून आकडे घेण्यात येत आहेत़ घरबसल्या या महिला मोबाईलवर आकडे घेत आहेत़ त्यांना घरातील इतर सदस्यही मदत करीत आहेत़ दुसरीकडे शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुणाईला आकड्यांच्या या खेळाची भुरळ पडली आहे़ मोबाईलमध्ये विविध अ‍ॅपद्वारे लकी क्रमांक काढून त्यावर पैसे लावण्यात येत आहेत़ 

श्रावस्तीनगर, लालवाडी, मिल एरियात भरते जत्रा
शहरातील श्रावस्तीनगर, लालवाडी आणि मिल एरियात रात्रीच्या वेळी जुगाऱ्यांची जत्राच भरते़ कल्याण, मिलन, बॉम्बे यासह इतर मटक्यांचे आकडे येण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत़ त्यामुळे त्यावेळेला आपण लावलेला आकडा आला की नाही हे पाहण्यासाठी जुगारी गर्दी करतात़ सकाळपासून सुरु झालेला हा खेळ रात्री उशिरापर्यंत सुरु असतो़ यामध्ये कमी वेळात अन् परिश्रमाशिवाय पैसे मिळत असल्यामुळे अनेकजण आता या व्यवसायात उतरले आहेत़ विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या शेजारीच अनेक ठिकाणी जुगाऱ्यांची दुकाने थाटली आहेत़ 

चव्हाणांचा इशारा
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वीही जिल्ह्यात मटका, वाळू यासह इतर अवैध धंदे चालू देणार नाही असा इशारा दिला होता़ शनिवारी भोकरच्या सभेतही त्यांनी याचा पुनरुच्चार केला़ तसेच त्या हद्दीतील ठाणेदाराला जबाबदार धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे़ 

Web Title: 'open-close'; illegal matka lottery runs openly in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.