दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 17:50 IST2021-07-21T17:50:14+5:302021-07-21T17:50:39+5:30
One killed on the spot in Accident at Bhokar : भोकर तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात झाला अपघात

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एकजण जागीच ठार; दोघे गंभीर जखमी
भोकर ( नांदेड ) : दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ( दि. २१) सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात घडली आहे. संभाजी अशोक ढगे असे मृताचे नाव आहे.
उमरी तालुक्यातील ईज्जतगाव संभाजी अशोक ढगे ( २८) हा मंगळवारी ( दि. २० ) बिलोली तालुक्यातील कांगठी या सासरवाडीला गेला होता. आज सकाळी भोकर तालुक्यातील नांदा येथे राहणाऱ्या मेव्हणीला सणानिमित्त आणण्यासाठी संभाजी आणि त्याचा मेव्हूणा शंकर हनमंत नरवाडे (१६, रा. कांगठी ) दुचाकीवरुन गेले. दरम्यान, भोकर तालुक्यातील बटाळा ते दिवशी रस्त्यावरील कोळगाव शिवारात समोरुन येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
या जोरदार धडकेत संभाजी अशोक ढगे याच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. तर मेव्हूणा शकंर नरवाडे व दुसऱ्या दुचाकीवरील गजानन यलप्पा कुंटावाड ( ३०,रा. नांदा ता. भोकर ) हे दोघे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.