एकाच सरणावर आई आणि दोन चिमुकल्या मुलींना दिला भडाग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:43 IST2018-06-25T00:40:03+5:302018-06-25T00:43:12+5:30
कुंडलवाडी शहरातील नई आबादीमध्ये वास्तव्यास असलेल्या यादव श्रीनिवास कांबळे याच्या मयत पत्नी व दोन चिमुकल्या मुलींना येथील तलकापूर रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर मयत पूजा कांबळेच्या वडिलांनी पोटच्या लेकीला आणि नातीला भडाग्नी दिला.

एकाच सरणावर आई आणि दोन चिमुकल्या मुलींना दिला भडाग्नी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंडलवाडी : कुंडलवाडी शहरातील नई आबादीमध्ये वास्तव्यास असलेल्या यादव श्रीनिवास कांबळे याच्या मयत पत्नी व दोन चिमुकल्या मुलींना येथील तलकापूर रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर मयत पूजा कांबळेच्या वडिलांनी पोटच्या लेकीला आणि नातीला भडाग्नी दिला.
२३ जून रोजी पूजा यादव कांबळे हिने तिच्या दोन मुलींसह गोदावरी पात्रात आत्महत्या केली होती. पैकी एक सुविद्या कांबळे हिला शोधण्यास पोलिसांना यश आले होते. परंतु दिवस मावळल्याने शोधकार्य थांबले. दुसऱ्या दिवशी २४ जून रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान मयत पूजा यादव कांबळे व तिची ५ वर्षीय मुलगी शिवानी कांबळे यांचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांचे प्रेत पोलिसांनी मच्छीमारांच्या सहाय्याने काढून कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
रात्री (काल) उशिरा ३ वर्षीय सुविद्या कांबळेवर उत्तरीय तपासणी केली व आज आई व मुलीवर उत्तरीय तपासणी करुन मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले. तीनही मृतदेह मयताचे वडील चांदू गणपती वाघमारे (रा. तेल्लूर ता. कंधार) यांच्याकडे दिले. दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान मयत आई व दोन मुलींवर अंत्यसंस्कार करताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. तीनही मृतदेहाचे डॉ. विनोद माहुरे यांनी शवविच्छेदन केले.
याप्रकरणी चांदू गणपती वाघमारे रा. तेल्लूर यांच्या फिर्यादीवरुन कुंडलवाडी पोलिसांत यादव श्रीनिवास कांबळे याच्यावर हुंडाबळीचा ४९८, ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ यादव कांबळे यास मुखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे हे करीत आहेत.