आता नांदेडहून मुंबई आणि गोवा फक्त एका तासावर!; बहुप्रतीक्षित विमानसेवा लवकरच सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:11 IST2025-10-28T15:09:24+5:302025-10-28T15:11:47+5:30
आठवड्याचे सातही दिवस असणार उपलब्ध; सध्या नांदेडहून दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. आता मुंबई आणि गोवा या दोन मार्गांचा समावेश झाल्याने एकूण सात विमानसेवा उपलब्ध होतील.

आता नांदेडहून मुंबई आणि गोवा फक्त एका तासावर!; बहुप्रतीक्षित विमानसेवा लवकरच सुरू
नांदेड : नांदेड–मुंबई आणि नांदेड–गोवा या बहुप्रतीक्षित विमानसेवा येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. नांदेड–मुंबई विमानसेवेसाठी नवी मुंबईऐवजी मुंबईतील मुख्य विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली होती, ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे.
खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, या दोन्ही विमानसेवांचे संचालन स्टार एअर ही कंपनी करणार असून, या सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. मुंबई–नांदेड विमान दुपारी ४:४५ वाजता मुंबईहून उड्डाण करून सायंकाळी ५:५५ वाजता नांदेडच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावर उतरेल. त्याच विमानाचे सायंकाळी ६:२५ वाजता नांदेडहून उड्डाण होऊन रात्री ७:३५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. गोव्याच्या मोपा विमानतळावरून नांदेडला येणारे विमान दुपारी १२ वाजता उड्डाण करून १ वाजता नांदेडला पोहोचेल, तर परतीचे उड्डाण दुपारी १:३० वाजता होऊन गोव्याला २:४० वाजता पोहोचेल. त्यामुळे आता नांदेडकरांना मुंबई अन् गोवा तासभराच्या अंतरावर असेल.
नांदेडसह शेजारील जिल्ह्यांनाही लाभ
या दोन्ही विमानसेवेमुळे नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीस्कर विमानसेवा मिळणार आहेत. विशेषतः मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याने व्यावसायिक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच नांदेड–गोवा विमानसेवा सुरू झाल्याने पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. सध्या नांदेडहून दिल्ली (हिंडन), अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबाद या पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. आता मुंबई आणि गोवा या दोन मार्गांचा समावेश झाल्याने एकूण सात विमानसेवा उपलब्ध होतील.
तिरूपती, शिर्डीसाठीही प्रयत्न
पुढील काळात नांदेडहून तिरूपती, शिर्डी आणि कोल्हापूरसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक यांसंबंधी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर विविध मागण्या मांडल्या असून त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.