'गाठ माझ्याशी आहे'; वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:56 IST2025-09-09T19:54:54+5:302025-09-09T19:56:00+5:30
निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांचे हाल! अर्धापूरमधील शासकीय वसतिगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

'गाठ माझ्याशी आहे'; वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड) : शहरातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील भोजन निकृष्ट असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना सोमवारी घडलेला प्रकार सांगितला व निवेदन दिले. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्रीजया चव्हाण यांनी अचानक वस्तीगृहास भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरले तर व्यवस्थेत सुधारणा करा, अन्यथा गाठ माझ्याशी राहील असा इशारा दिला.
शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह आहे. येथे विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन करण्यात येते, तसेच निकृष्ट भोजन देण्यात येत असल्याची तक्रार सोमवारी विद्यार्थ्यांनी तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्याकडे केली. या प्रकरणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी चार वाजता वस्तीगृहास अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी याप्रकरणी चर्चा केली.
.. तर गाठ माझ्याशी
यावेळी आमदार चव्हाण यांनी संबंधित अधिकारी यांना धारेवर धरले व असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. अचानकपणे यापुढेही येथे भेट देण्यात येईल विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही. कोणताही त्रास होणार नाही. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अन्यथा गाठ माझ्याशी राहील, असा इशारा संबंधितांना यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनी दिला. यावेळी भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे, श्रावण भिलवंडे, प्रवीण देशमुख, राजेश्वर शेट्टे, माजी नगराध्यक्ष उमेश सरोदे, शहराध्यक्ष योगेश हळदे, उपनगराध्यक्ष मुक्तेदर पठाण, नगरसेवक गाजी काझी, व्यंकटी राऊत, गुरुराज रणखांब आदींची उपस्थिती होती.