ना बसायला जागा, ना स्वच्छतागृह; सोयीसुविधा नसतानाही नांदेड बसस्थानकाचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 16:40 IST2025-04-16T16:37:43+5:302025-04-16T16:40:46+5:30

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांचे हाल; ‘साहेब एसीतून आदेश देतात, इथे एक दिवस येऊन बघा!’

No place to sit, no toilet; Nanded bus stand shifted despite a plethora of facilities | ना बसायला जागा, ना स्वच्छतागृह; सोयीसुविधा नसतानाही नांदेड बसस्थानकाचे स्थलांतर

ना बसायला जागा, ना स्वच्छतागृह; सोयीसुविधा नसतानाही नांदेड बसस्थानकाचे स्थलांतर

नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे अखेर प्रशासनाने बसस्थानक स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपासून हे बसस्थानक कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले. मात्र स्थलांतरीत करताना प्रवाशांच्या प्राथमिक गरजांचा विचार न करता, केलेल्या बदलामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दररोज ९०० बसद्वारे सुमारे १८०० फेऱ्यांच्या माध्यमातून हजारो प्रवाशांची ने-आण केली जाते. अशावेळी बसस्थानकातील सोयी-सुविधा गर्दीनुसार आवश्यक असताना तात्पुरत्या बसस्थानकावर पंखे नाहीत, वीज पूर्णपणे उपलब्ध नाही, बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही आणि स्वच्छतागृहाचे काम अजूनही सुरूच आहे. परिणामी महिला, वयोवृद्धांसह लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गरमीचा प्रहर त्यात धुळीचा कहर
सध्या एप्रिल महिना असून तापमान तब्बल ४१ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. अशा कडक उन्हात बसण्यासाठी सावली नाही, वाऱ्यासाठी पंखे नाहीत आणि पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नाही. त्यात बस येताना उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांचे हाल दुप्पट झाले आहेत. निवाऱ्यासाठी उभारलेल्या टीनशेडमध्ये बसलेल्या प्रवाशांवर उकाड्यामुळे चक्कर येण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीमुळे नागरिकांचे हाल
या स्थलांतरासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकाही झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने आवश्यक सुविधा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्या सूचना अमलात आणल्या गेल्या नाहीत. दरम्यान, स्थलांतराची लगीनघाई करत १३ एप्रिलपासून बसस्थानक स्थलांतरीत करण्याचे पत्रक काढण्यात आले. मात्र येथे कोणत्याच सोयी-सुविधा नसल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यावर विभाग नियंत्रकांनी पथक पाठवून सोयी-सुविधांची पूर्तता करूनच स्थलांतर करण्याचे सुधारित लेखी आदेश १२ रोजी काढले. परंतु, या आदेशाला केराची टोपली दाखवत यंत्रणेने कोणत्याही सुविधेविना गाड्या कवठ्यातून पाठविण्यास प्रारंभ केला आहे.

‘साहेब एसीतून आदेश देतात, इथे एक दिवस येऊन बघा!’
एक प्रवासी म्हणाले, ‘साहेब बसलेत एसीमध्ये, फाईलवर सही करतात. पण एक दिवस इथे येऊन उभं राहून बघा, काय त्रास होतो! किती ऊन आहे, किती धूळ आहे, माणूस गरमीने हैराण होतो. इथे आल्याशिवाय त्यांना कळणार तरी कसं?’ ही प्रतिक्रिया प्रशासनाच्या प्रत्यक्ष सहभागाविना घेतल्या गेलेल्या निर्णयावर थेट बोट ठेवणारी आहे. नांदेड- शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे अखेर प्रशासनाने बसस्थानक स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपासून हे बसस्थानक कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले. मात्र स्थलांतरीत करताना प्रवाशांच्या प्राथमिक गरजांचा विचार न करता, केलेल्या बदलामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: No place to sit, no toilet; Nanded bus stand shifted despite a plethora of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.