परदेशी गेलेल्या काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 19:06 IST2020-08-21T19:05:14+5:302020-08-21T19:06:50+5:30
लेंडी धरणग्रस्तांच्या घरासाठी मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात मावेजा वाटप करणे सुरु आहे़

परदेशी गेलेल्या काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव फसला
मुक्रमाबाद (नांदेड) : सध्या लेंडी धरणग्रस्तांना घराचा मावेजा वाटप करण्याचे काम सुरु आहे़ या ठिकाणी परदेशात असलेल्या काकाच्या नावाने आलेला मावेजा उचलण्यासाठी पुतण्याने नोटीसीला आपले आधार कार्ड आणि बँक खात्याची झेरॉक्स जोडली़ परंतु मावेजा वाटप करणाऱ्यांनी पुतण्याचा हा डाव लगेच ओळखत त्याला तुरुंगाची हवा खायला भाग पाडले़ १९ आॅगस्ट रोजी मुक्रमाबाद ही घटना घडली़
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या लेंडी धरणग्रस्तांच्या घरासाठी मुक्रमाबाद येथील शासकीय विश्रामगृहात मावेजा वाटप करणे सुरु आहे़ जवळपास १३१० घर मालकांना हा मावेजा वाटप करण्यात येणार आहे़ त्यासाठी त्यांना मावेजाच्या रितसर नोटीसा देण्यात आल्या आहेत़ तिसऱ्या टप्प्यातील वार्ड क्रमांक ५ मधील मावेजा वाटप करण्याचे काम १९ आॅगस्ट रोजी सुरु होते़ परदेशात राहत असलेल्या जावेद चाँदसाब शेख यांच्या नावाने ९७ हजार ३७७ रुपयांचा मावेजा आला होता़ परंतु जावेद चाँदसाब हे विदेशात असल्याने ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते़
त्यांच्या नावाने आलेली नोटीस त्यांचा पुतण्या शेख साजीद शेख माजीद (२४) याने उचलली़ त्यानंतर कॅश क्रेडीट कार्डवर स्वाक्षरी करुन नोटीसीला आपले आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील जोडत मावेजा उचलण्याचा प्रयत्न केला़ नोटीसवर असलेले धरणग्रस्ताचे नाव आणि आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील यामध्ये तफावत आढळून आली़ याबाबत लगेच लक्ष्मण विठ्ठलराव टेकाळे यांनी हटकले़ तसेच या प्रकरणात मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली़ त्यावरुन शेख साजीद शेख माजीद याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला़ या प्रकरणाचा तपास शिवाजी आडेकर हे करीत आहेत़