‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात माहूरगडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:03 IST2020-10-17T18:59:38+5:302020-10-17T19:03:51+5:30
Navratri गडावर जाणाऱ्या रस्त्यावर चोख बंदोबस्त

‘उदे गं अंबे उदे’च्या गजरात माहूरगडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ
माहुर (जि. नांदेड): महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान गडावर शनिवारी परंपरेनुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. ‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात पहिल्या माळेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. अभिषेकांचे सहस्त्रआवर्तन देत मुख्य देवता श्री रेणुकामातेच्या वैदिक महापूजेने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला.
नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ९ वाजता श्री रेणुकामातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर, श्री परशुराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात सप्त धान्य टाकून, कुंडावर मातीचा कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, तर सभोवताली पाच उसाचे धांडे उभारुन आणि त्याअधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी घटस्थापना करण्यात आली. यावेळी पंचामृताने अभिषेक करण्यात आला. घटस्थापनेनंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम जगताप, सहा. जिल्हाधिकारी किनवट तथा पदसिद्ध सचिव किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते कुमारिकापूजन करण्यात आले.
पुजारी विनायक फांदाडे, चंद्रकांत रिठे, दुर्गादास भोपी यांच्या हस्ते सिंगार, अलंकार करून राखाडी रंगाचे पैठणी महावस्त्र मातेला परिधान करण्यात आले. दुपारी १२़३० वाजता संस्थानचे अध्यक्ष श्रीराम जगताप, सचिव किर्तीकिरण पुजार, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर आदींच्या हस्ते महाआरती करण्यात आली, नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरतीपूजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, भवानीदास भोपी, आशिष जोशी, पुजारी शुभम भोपी, आश्विन भोपी यांची उपस्थिती होती.
गडावर जाणाऱ्या रस्त्यावर चोख बंदोबस्त
प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदिरात देवीसमोर अखंड नंदादीप तेवत ठेवून दररोज दहीभात, पुरणपोळीचा नवैद्य, आरतीनंतर छबिना काढला जावून श्री रेणुकामाता ज्या गडावर प्रकटली, त्या गडाला प्रदक्षिणा घालून छबिना परत रेणुका मंदिरात येत असतो. कोरोना महामारीमुळे भाविकांविना पुजारी व विश्वस्त समिती यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने यंदा घटस्थापना करण्यात आली. गडावर जाणाऱ्या रत्यावरील टी पॉर्इंट व मेन रोडवर पोलिसांनी बॅरिकेट लावून भाविकांनी गडावर जावू नये यासाठी उपाययोजना केली आहे.