नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २-ड मधील लढत सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कारण येथील सामना केवळ पक्षांमध्ये नाही, तर थेट भावकीतील नेत्यांमध्ये रंगला आहे. माजी उपमहापौर विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी ही लढत असली, तरी त्यामागे सख्ख्या भावांची राजकीय फाटाफूट असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तरोडा परिसराचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून नगरसेवक व उपमहापौरपद भूषविलेले सतीश देशमुख यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळेच त्यांच्या विरोधात पूर्वाश्रमीचा त्यांचाच कार्यकर्ता संदीप देशमुख काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरला आहे. विशेष म्हणजे, संदीप देशमुख यांना सतीश देशमुख यांचे सख्खे बंधू महेश देशमुख यांची उघड साथ मिळत आहे. त्यामुळे ही लढत अधिकच प्रतिष्ठेची ठरत आहे.
तरोडा हा भाग कल्याणकर आणि देशमुख परिवारामुळे आधीपासूनच राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. त्यातच माजी खासदार दिवंगत व्यंकटराव तरोडेकर यांच्यामुळे या भागाला स्वतंत्र ओळख मिळाली. तरोडा गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर येथील राजकारण अधिकच चुरशीचे बनले असून, प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे.२०१७ मध्ये काँग्रेसच्या माध्यमातून सतीश देशमुख यांना नगरसेवक म्हणून संधी मिळाली. पुढे अडीच वर्षे त्यांनी उपमहापौरपदाची धुरा सांभाळली. मात्र, त्यांच्या कार्यकाळात मुळ तरोडा गावातील मूलभूत प्रश्न मार्गी न लागल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये असलेले त्यांचे छोटे बंधू महेश देशमुख अधिक सक्रिय झाले आहेत. स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर विविध प्रभागांची जबाबदारी सोपविली असून, त्यांनी सर्वसामान्य आणि युवा चेहऱ्याला संधी देत काँग्रेस - वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संदीप देशमुख यांना रिंगणात उतरविले आहे. तसेच भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माणिक देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या माध्यमातून राजकीय मैदानात उडी घेतली आहे. संपर्कातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख असून, त्यांनी आपली राजकीय ‘घडी’ बसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. शिवाय शिंदेसेनेकडून सचिन देशमुखही निवडणूक रिंगणात असल्याने ‘देशमुख’ आडनावाचीच सर्वाधिक चर्चा या प्रभागात आहे.
या प्रभागात बसपाचे धम्मपाल गच्चे, आम आदमी पार्टीचे योगराज गडपाळे, उद्धवसेनेचे मो. सईदोद्दीन मो. हाफीजोद्दीन, एमआयएमचे फूरखान रहीमखान तसेच अपक्ष अझहरखान पठाण व शेख शाफे सुफियान असे एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. मूळ तरोड्यातील मतदारांसह मुस्लीम व दलित मतदार या प्रभागाच्या विजयाचे गणित ठरवणार आहेत. चार देशमुख आणि चार मुस्लीम उमेदवार मैदानात असल्याने मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विजयाची किल्ली कुणाकडे?मूळ तरोडा गावातील पारंपरिक मतदार, मुस्लीम समाजातील मतांचे विभाजन, दलित मतदारांचा कल आणि देशमुख परिवारातील अंतर्गत मतभेद की एकजूट या चार घटकांवरच प्रभाग क्रमांक २-ड मधील विजयाचे गणित अवलंबून आहे. त्याचाच परिणाम अ, ब आणि क मधील उमेदवारांवरदेखील होवू शकतो. नांदेड उत्तरचे नेतृत्व बालाजीराव कल्याणकर यांच्याकडे असल्याने शिंदेसेनेची ही जमेची बाजू आहे. त्यामुळे या प्रभागातील लढत सर्वसाधारणमधील उमेदवारांमुळे अधिकच चुरशीची अन् चर्चेची ठरली आहे.
Web Summary : Nanded's Ward 2-D witnesses a fierce family feud as Deshmukh brothers clash. A BJP candidate faces his nephew, backed by his brother in Congress, splitting votes. This internal conflict and the Muslim/Dalit vote will decide the winner.
Web Summary : नांदेड के वार्ड 2-डी में देशमुख भाइयों के बीच ज़ोरदार पारिवारिक कलह देखने को मिल रही है। एक भाजपा उम्मीदवार का सामना उनके भतीजे से है, जिसे कांग्रेस में उनके भाई का समर्थन प्राप्त है, जिससे वोट बंट रहे हैं। यह आंतरिक संघर्ष और मुस्लिम/दलित वोट विजेता का फैसला करेंगे।