Nanded: शेजाऱ्यांच्या सांत्वनास गेल्या, पार्थिव पाहिले अन् हार्ट अटॅकने महिलेचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 18:05 IST2025-10-27T18:04:25+5:302025-10-27T18:05:26+5:30
सावरगाव नसरत गावावर दुहेरी शोककळा

Nanded: शेजाऱ्यांच्या सांत्वनास गेल्या, पार्थिव पाहिले अन् हार्ट अटॅकने महिलेचाही मृत्यू
- गोविंद कदम
लोहा ( नांदेड): तालुक्यातील सावरगाव (न) या गावात २७ ऑक्टोबरचा दिवस दुःखाचा डोंगर घेऊन आला. एकाच दिवशी दोन दुःखद घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गावातीलच बालाजी बापूराव कदम (वय ५५) यांचे २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गाव दु:खात बुडाला. त्याच गावातील शेजारीण चौत्राबाई रामबुवा पुरी (वय ६५) या रात्री दोनच्या दरम्यान कदम यांच्या घराकडे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेल्या. बालाजी कदम यांच्या निधनाने स्तब्ध झालेल्या चौत्राबाईंना ते दृश्य सहन झाले नाही. पार्थिवाजवळ काही क्षण शांतपणे बसल्यानंतर त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ लोहा येथील खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
काही तासांत दोन मृत्यू
एका गावात, काही तासांच्या अंतरात घडलेल्या या दोन मृत्यूंनी सावरगाव नसरत गाव शोकसागरात बुडाले. “ज्यांना पाहण्यासाठी गेल्या, त्यांच्याच दु:खाने त्या स्वतः निघून गेल्या... ही नियतीचा क्रूर खेळ आहे,” अशी हळहळ गावकरी व्यक्त करत आहेत. दोघांचाही अंत्यविधी गावातील स्मशानभूमीत त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत व समाजरितीप्रमाणे पार पडला. एकाच दिवशी दोन व्यक्तींना गमावल्याने गावात गहिवरून गेलेले वातावरण पसरले आहे.