Nanded: नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून परत जाणाऱ्या वाहनाला धडक; एक ठार, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:21 IST2025-12-10T13:21:12+5:302025-12-10T13:21:16+5:30
बामणी फाट्याजवळील शिवगंगा पेट्रोल पंपासमोर मागून आलेल्या भरधाव कारने रिक्षाला दिली धडक

Nanded: नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून परत जाणाऱ्या वाहनाला धडक; एक ठार, तीन जखमी
हदगाव, जि. नांदेड : चिंचगव्हाण येथील नागरिक अंत्यविधी आटोपून ऑटोने गावाकडे येत असताना ८ डिसेंबर रोजी सायंकाळी बामणी फाट्याजवळील शिवगंगा पेट्रोल पंपासमोर मागून आलेल्या कारने जोराची धडक दिली. या अपघातात अशोक काशीनाथ नेवरकर (४०, रा. सोनारी ता. हिमायतनगर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये शोभाबाई उत्तम शेळके (६४, रा. मोरगव्हाण), द्रोपदाबाई रामराव पाटे (७२, रा. हदगाव) आणि सिंधुबाई नारायण हुंबे (५०, रा. चिंचगव्हाण) यांचा समावेश आहे. हे सर्व जण ऑटो क्रमांक एमएच. २६, बीडी. २८१२ (रा. इरसोनी) मधून चिंचगव्हाण येथे अंत्यविधीसाठी आले होते. अंत्यविधी उरकून परत जात असताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलिस स्टेशनचे सपोनि. विलास चवळी व बिट जमादार अशोक दाढे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना तत्काळ हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सुरू आहे.