'तिकडे ट्रॅक्टर नको घालू'; चालकाने महिलांचं ऐकलं असतं तर वाचले असते सात जणींचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:07 IST2025-04-05T13:05:54+5:302025-04-05T13:07:13+5:30
Nanded Tractor Accident: चालकाचा निष्काळजीपणा अन् हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला.

'तिकडे ट्रॅक्टर नको घालू'; चालकाने महिलांचं ऐकलं असतं तर वाचले असते सात जणींचे प्राण
नांदेड : पाऊस झालेला असल्याने चारीतून ट्रॅक्टर निघणार नाही, चढ-उतार आहे. तिकडे ट्रॅक्टर नको घालू, आम्हाला इकडेच उतरू दे, असे सांगूनही चालक नागेश आवटे याने केलेली डेरिंग सात महिलांच्या जीवावर बेतली. त्या शेतमजूर महिलांनी केलेली विनवणी नागेशने ऐकली असती तर ही वेळ आलीच नसती, त्याचा निष्काळजीपणा अन् हुल्लडबाजीनेच हा अपघात झाल्याचे सांगत नातेवाइकांनी त्याच्याविषयी रोष व्यक्त केला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.
रुंज, आलेगाव ते कांचननगर रस्त्यापासून जवळपास एक किलोमीटर आत शिंदे यांचे शेत आहे. ज्या शेतात भुईमूग आहे, तिथे ट्रॅक्टर घेऊन जाणे शक्य नाही. पण, सध्या गहू कापणीनंतर रान रिकामं झालेलं आहे. त्यामुळे नागेशने विहीर असलेल्या शेताच्या बाजूने दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे चारी ओली होती. त्यामुळे तेथून ट्रॅक्टरवर काढण्यासाठी त्याला कसरत करावी लागली. ट्रॉली जाणार नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलांनी इथेच उतरू दे, आम्ही पायी येताे, असा आग्रही धरला. पण, नागेशने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चारीतून ट्रॅक्टर काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्पीड वाढविली अन् ट्रॅक्टर चारीतून निघून थेट विहिरीत कोसळले. विहिरीत पडलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पण, ट्रॉलीखाली अडकलेल्या सात जणींचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन तरुणींचा समावेश आहे.
रात्री उशिरा चालक ताब्यात
नागेश आवटे हा अनेक वर्षांपासून दगडोजी शिंदे यांच्या शेतात काम करतो. त्यामुळे त्यांचे ट्रॅक्टरदेखील तो चालवितो. त्याचे वय १६-१७ वर्ष असल्याची चर्चा होती. अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टरसारख्या वाहनाचे स्टेअरिंग दिलेच कशाला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मात्र, अपघातानंतर पसार झालेल्या चालकास पोलिसांनी बचाव कार्य संपल्यानंतर शोधून काढले. चौकशीअंती तो अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सपोनि बोधनकर यांनी सांगितले.
ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचे सांगत ठोकली धूम
चालक नागेश याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटताच उडी घेतली. त्यामुळे त्याचा प्राण वाचला. मात्र, मातीत कष्ट करून पोट भरणाऱ्या महिलांना त्याने मृत्यूचे दाढेत लोटले. घटनेनंतर घटनास्थळावरून धूम ठोकणाऱ्या नागेशने रस्त्यात मेंढपालांना घडलेला प्रकार सांगितला. महिलांसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचे सांगितल्याने मेंढपालांनी परिसरातील शेतकऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली.