मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यावर १७ वार; निर्घृण हत्येने नांदेड पुन्हा हादरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:01 IST2026-04-06T11:59:54+5:302026-04-06T12:01:03+5:30

सलग ३ दिवसांत ५ खून; नांदेडमध्ये गँगवॉर भडकलं? सोनू कल्याणकर यांच्या हत्येने शहरात दहशतीचे वातावरण.

Nanded shaken again by brutal murder!: Shiv Sena Shinde Group Leader Sonu Kalyankar Stabbed to Death During Morning Walk | मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यावर १७ वार; निर्घृण हत्येने नांदेड पुन्हा हादरले!

मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यावर १७ वार; निर्घृण हत्येने नांदेड पुन्हा हादरले!

नांदेड - शहरातील खुनाची मालिका सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा सुरूच असून सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेला शिंदेसेनेचा पदाधिकारी सोनू कल्याणकर याची निर्घृण हत्या करण्यात आली. क्लासेस हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय गजबजलेल्या श्रीनगर भागात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. 

शुक्रवारी रात्री शहरातील कॅनॉल रोडवर तिहेरी हत्याकांड घडले होते. वर्चस्वावरून भडकलेल्या या घटनेला चोवीस तासही पूर्ण झाले नसताना मुरमुरा गल्लीत शनिवारी तलवार व खंजर हल्ल्यात रणजितसिंह तबेलेवाले या तरुणाचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ सोमवारची पहाट पुन्हा रक्तरंजीत हल्ल्यानेच उगवली. रामराव पवार मार्गावर राहणारा तरुण सोनू कल्याणकर (वय ३३) हा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडला असता पाळत ठेवून असलेल्या तिघांनी त्याला श्रीनगर भागातील कुमार ड्रेसेसच्या समोर गाठत खंजरने हल्ला चढवला. भर रस्त्यावर घडलेला प्रकार पाहून मॉर्निंग वॉकसाठी बाजूने जात असलेल्या नागरिकांमध्ये धावपळ उडाली. स्थानिकांनी त्याला आयटीआय चौक परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेतील हल्लेखोर आधीपासूनच त्याच्यावर पाळत ठेवून होते. कल्याणकर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी खंजरचे सपासप वार करत तेथून पळ काढला. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तीन दिवसांत हा पाचवा खून असून प्रत्येक घटनेत तलवार व खंजरचा मुक्त वापर केल्याचे दिसून येते. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रकरणी काही महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके कार्यान्वित केली आहेत.

यापूर्वीसुद्धा झाला होता कल्याणकरवर हल्ला
सोनू कल्याणकर हा वॉटर प्लांटवर बसला असता तीन वर्षांपूर्वी रिंदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता, त्यात तो बचावला. गोळीबार करणारा गोलू मंगनाळे सध्या तुरुंगात असून या हत्येमागे त्याचा सहभाग आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. सोनू कल्याणकर हा मागील अनेक वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. काही दिवसांपूर्वी त्याने भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. शिवसेना युवा शहर प्रमुख म्हणूनही तो कार्यरत होता. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी त्याने पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. 

हत्याराचे घाव, शरीराची चाळण
सोनू कल्याणकर याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविण्यात आला. हल्लेखोरांनी सोनूच्या शरीरावर तब्बल १७ पेक्षा जास्त वार केले असून यात त्याच्या शरीराची चाळण झाली आहे. अतिरक्तस्त्रावामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला. सोनू कल्याणकर याच्यावरसुद्धा अनेक गुन्हे दाखल असून पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाल्याची चर्चा आहे.

Web Title : मॉर्निंग वॉक पर शिवसेना नेता की हत्या; नांदेड़ में दहशत

Web Summary : नांदेड़ में मॉर्निंग वॉक के दौरान शिवसेना नेता की निर्मम हत्या से सनसनी फैल गई। पुरानी दुश्मनी के चलते दिनदहाड़े हुए इस हमले ने शहर में लगातार तीसरे दिन हत्याओं का सिलसिला जारी रखा है, जिससे सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Shiv Sena Leader Murdered During Morning Walk; Nanded Shaken

Web Summary : Nanded reels after a Shiv Sena leader was brutally murdered during his morning walk. The broad daylight attack, fueled by old rivalries, marks the third consecutive day of killings in the city, raising serious concerns about public safety and law enforcement.