तहसीलदार साहेब, तुमची टाटा सियारा गाडी कशी आहे? वाळूमाफियांनी ‘गिफ्ट’ दिल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:41 IST2026-04-10T12:40:10+5:302026-04-10T12:41:43+5:30
तहसीलदारांना वाळूमाफियांनी टाटा सियारा ‘गिफ्ट’ दिल्याची चर्चा; विधिमंडळ समितीची थेट विचारणा

तहसीलदार साहेब, तुमची टाटा सियारा गाडी कशी आहे? वाळूमाफियांनी ‘गिफ्ट’ दिल्याची चर्चा
नांदेड/बिलोली: विधिमंडळ अंदाज समितीने ९ एप्रिल रोजी सायंकाळी बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटाला दिलेल्या भेटीदरम्यान जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाचे गंभीर वास्तव समोर आले आहे. नदीपात्रात साचलेले वाळूचे प्रचंड ढिगारे पाहून समिती प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे आणि तहसीलदार गजानन शिंदे यांचे तात्काळ निलंबन करण्याच्या सूचना खोतकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
'टाटा सियारा' गाडीची चर्चा रंगली
पाहणी दरम्यान, वाळू माफियांनी तहसीलदारांना एक महागडी 'टाटा सियारा' गाडी भेट दिल्याचा मुद्दा समितीसमोर आला. यावर आमदार खोतकर यांनी थेट विचारणा केली की, "शिंदे साहेब, तुमची टाटा सियारा गाडी कशी आहे?" त्यावर तहसीलदारांनी ही गाडी स्वतः विकत घेतल्याचा दावा केला. मात्र, कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध साठा पाहून अधिकाऱ्यांच्या दाव्यावर समितीने अविश्वास दाखवला.
आमदारांची टोलेबाजी आणि सज्जड दम
अवैध उपशासाठी जेसीबीचा वापर केला का? या प्रश्नावर "आम्ही केवळ मजुरांकडून वाळू उपसा करून घेतला," असे उत्तर प्रशासनाने दिले. यावर संतापलेल्या खोतकरांनी टोला लगावला की, "एवढे कार्यक्षम मजूर आम्हाला हवे आहेत, त्यांचे नाव-पत्ते द्या, त्यांना आमच्या जिल्ह्यात घेऊन जाऊ." सगरोळीतील हा प्रकार महसूल विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला असून, लवकरच या प्रकरणात मोठ्या कारवाईची चिन्हे आहेत.