Nanded Municipal Corporation exempts corporators tax for property owner | नांदेड महापालिकेची मालमत्ताधारकांसाठी शास्तीमाफी
नांदेड महापालिकेची मालमत्ताधारकांसाठी शास्तीमाफी

ठळक मुद्दे२०५ कोटींच्या थकबाकीचा डोंगरकरवसुलीसाठी उरले ४ महिने

नांदेड : शहरातील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने पुन्हा एकदा शास्तीमाफी योजना जाहीर केली असून ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ताधारकांना १०० टक्के शास्तीमाफीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आयुक्त लहुराज माळी यांनी दिली. आजघडीला जवळपास ६५ कोटींची शास्तीची रक्कम थकीत आहे. 

शहरात महापालिकेने थकबाकीवरील शास्तीमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय आॅगस्टमध्येही घेतला होता. ज्या मालमत्ताधारकांना त्याच वर्षात कर भरणा केला नाहीतर दरमहा २ टक्के दराने शास्ती आकारण्यात आली आहे. शास्तीचा हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी शास्तीमधून सूट देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पहिल्या टप्प्यात थकबाकी शास्तीमध्ये ५० टक्के सूट दिली. ती सूट १०० टक्के करण्याचा निर्णय २३ आॅगस्ट रोजी घेण्यात आला होता. १ एप्रिल २०१९ पासून ज्या मालमत्ताधारकांनी शास्तीची रक्कम भरणा केली असेल ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा राहील, असे सांगताना ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा लाभ देण्यात आला होता.

या मुदतीत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मालमत्ताधारकांना आणखी एक महिना शास्तीमाफीचा लाभ मिळणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत शहरवासिय मालमत्ता करावरील शास्तीमाफीचा लाभ घेवू शकणार आहेत.  याबाबत आयुक्तांनी मंगळवारी निर्णय घेतला आहे. महापालिकेची एकूण मालमत्ता कराची थकीत रक्कम तब्बल २०५ कोटी रुपये इतकी आहे. चालू वर्षाची मालमत्ताकराची रक्कम ही ५५ कोटी रुपये इतकी आहे. त्यातील ६५ कोटी रुपये हे शास्तीच्या रक्कमेतील आहेत. त्यामुळे थकीत कराचा आकडा मोठा दिसत असल्याचे सांगण्यात आले. शास्तीमाफी योजनेमुळे नागरिक आपल्याकडील कर अदा करतील असा विश्वास आयुक्त माळी यांनी व्यक्त केला. महापालिकेने २०१८-१९ मध्ये सर्वाधिक ४८ कोटी रुपये करवसुली केली होती. यावर्षी हा आकडा ५५ कोटींपर्यंत नेण्याचा विश्वास उपायुक्त अजितपाल संधू यांनी व्यक्त केला. 
कर वसुलीसाठी चार महिने उरले आहेत. या चार महिन्यांतील कर वसुलीचे नियोजन करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांविरुद्ध कारवाईही केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी शास्तीमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गुरुद्वारा बोर्ड पदाधिकाऱ्यांशी चर्चा
महापालिकेत मंगळवारी गुरुद्वारा बोर्ड पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त माळी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत गुरुद्वारा बोर्डाच्या विकासकामांना परवानगीचा विषय प्राधान्याने चर्चेत आला. गुरुद्वारा बोर्डाचे सहा कामे सुरू असून त्यातील एक प्रस्ताव मनपास्तरावर मंजूर करता येईल, असे माळी यांनी स्पष्ट केले. दोन प्रस्तावांच्या मंजुरीसाठी हायराईज कमिटीची बैठक येत्या दोन-तीन दिवसांत घेतली जाणार आहे. तर तीन प्रस्तावांबाबत शासनस्तरावर निर्णय घेतला जाईल. मनपाने घोषित केलेल्या शास्तीमाफीचा गुरुद्वारा बोर्डालाही लाभ मिळणार आहे. तब्बल दोन कोटींची शास्तीची रक्कम माफ होणार आहे. गुरुद्वारा बोर्डाकडून मालमत्ताकरापोटी महापालिकेला ६ कोटींचे येणे होते. त्यात भूसंपादनापोटी गुरुद्वारा बोर्डाला महापालिका ३ कोटी ४५ लाखांचे देणे आहे. या सर्व बाबीवर गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स.भूपिंदरसिंह मिनहास यांनी आयुक्त माळी यांच्याशी चर्चा केली.

शहरवासियांसाठी उपयुक्त निर्णय-गाडीवाले
महापालिका प्रशासनाने शास्तीमाफी योजना ३१ डिसेंबर पर्यंत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरवासियांसाठी हा निर्णय योग्य ठरणार आहे. यापूर्वी निवडणूक काळात या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. पण आता शहरवासिय शास्तीमाफी योजनेचा लाभ घेतील, असे महापालिकेचे सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले म्हणाले.

Web Title: Nanded Municipal Corporation exempts corporators tax for property owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.