Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 18:37 IST2025-09-18T18:36:31+5:302025-09-18T18:37:10+5:30
आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुंबळ हाणामारीनंतर रिसनगावात तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
- गोविंद कदम
लोहा ( नांदेड) : तालुक्यातील रिसनगाव येथे मराठा समाज व शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून हाणामारी झाली. या घटनेत मराठा समाजातील विकास पवार व सुनील पवार हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून शिवा संघटनेचे कार्यकर्ते बालाजी एकलारे व दत्ता एकलारे यांनाही दुखापत झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी शासनाने लागू केलेला हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी करत शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच पार्श्वभूमीवर धोंडे यांच्या संस्थेतून २१ पालकांनी आपल्या मुलांचे टीसी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. प्रत्युत्तरादाखल ओबीसी समाजाकडूनही मराठा संस्थेतील २३ पालकांनी सामूहिकरीत्या टीसीसाठी अर्ज केला. या घटनांमुळे गावातील तणाव चिघळून शेवटी वाद हाणामारीत परिवर्तित झाला.जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विकास पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेनंतर नांदेड येथील सकल मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच रिसनगाव येथे तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही औपचारिक नोंद माळाकोळी पोलीस ठाण्यात झालेली नसल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांनी लोकमतशी बोलताना दिली. मराठा–ओबीसी आरक्षणाच्या वादाला आता धोकादायक वळण लागले असून दोन्ही समाजातील तणावामुळे पुढील काळात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शांतता बैठकीतन वाद, हाणामारीत रूपांतर
लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील विठ्ठल-रुक्माई मंदिरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार भीमाशंकर कापसे यांनी सर्व समाजातील नागरिकांची बैठक आयोजित केली होती. बैठकीत मराठा-ओबीसी वाद थांबवावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. मात्र, चर्चा मार्गी न लागता वाद चिघळला व शेवटी तो हाणामारीत परिवर्तित झाला. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.