Nanded: लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार; उमरा गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:16 IST2025-08-28T18:15:10+5:302025-08-28T18:16:10+5:30
तालुक्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे.

Nanded: लोहा तालुक्यात पावसाचा हाहाकार; उमरा गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर
- गोविंद कदम
लोहा : तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू असून सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील उमरा गावात पाणी शिरल्यामुळे सात ते आठ कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत तसेच गावातील काही घरांमध्ये आसरा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी व जिल्हा परिषद उपअभियंता शिवाजी राठोड यांनी दिली आहे.
लिंबोटी धरणाचे तब्बल १५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रासह परिसरातील गावांमध्ये पाणी वाढले असून अनेक ठिकाणी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, हळद यांसारख्या पिकांवर पावसाचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे हातचे पीक पाण्यात बुडाले आहे. इतकेच नव्हे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे.
दरम्यान, लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसीलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी तसेच आपत्ती व्यवस्थापनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा कमी पडू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून उमरा येथे तातडीने आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले आहे. सततचा पाऊस, धरणांमधील विसर्ग आणि नदीपात्रातील वाढते पाणी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.