Nanded: कंधार तालुक्यात मुसळधार पावसामुळे २० गावात शिरले पाणी, चार गावचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 13:24 IST2025-08-28T13:21:22+5:302025-08-28T13:24:04+5:30

पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील लाडका, मानसिंगवाडी, रुई, मोहिदा परांडा या गावचा संपर्क तुटला आहे.

Nanded: Heavy rains in Kandhar taluka cut off communication with four villages, water entered 20 villages | Nanded: कंधार तालुक्यात मुसळधार पावसामुळे २० गावात शिरले पाणी, चार गावचा संपर्क तुटला

Nanded: कंधार तालुक्यात मुसळधार पावसामुळे २० गावात शिरले पाणी, चार गावचा संपर्क तुटला

कंधार (नांदेड): शहरासह तालुक्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. नद्या- नाल्यांना पूर आल्याने अनेक पुलावरून पाणी वाहत आहे. तालुक्यातील लाडका, मानसिंगवाडी, रुई, मोहिदा परांडा या गावचा संपर्क तुटला असून २० गावात पाणी शिरले आहे. तालुक्यात गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ५५.६ मिमी पाऊस झाला आहे. आणखी पावसाचा जोर वाढतच आहे.

बुधवारी तालुक्यात घरोघरी विघ्नहर्ता गणरायाचे आगमन झाले अन् सायंकाळपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. काही गावात रात्रीपासून तर काही गावात गुरूवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तालुक्यातील लाडका, मानसिंगवाडी, रुई, मोहिदा परांडा या गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावातील मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच हाळदा, दहीकळंबा, भूकमारी, धानोरा कौठा, चौकी महाकाय, मंगलसांगवी, लाडका, गोणार, शेलाळी, चौकी धर्मपुरी, देवईचीवाडी, गुंडा, जाकापूर, चिखली, नारनाळी, आलेगाव, बारूळ, पेठवडज, औराळ आदी गावात पाणी शिरले आहे. 

उर्ध्वमानार प्रकल्प धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे त्यामुळे धरणात येणारे अतिरिक्त पाणी कोणत्याही क्षणी मानार नदी व आजुबाजूच्या छोट्या छोट्या पात्रांमध्ये पाणी सोडावे लागणार आहे. तरी आजुबाजूच्या गावातील नदीच्या काठावर घर, शेती असणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहून त्यांची मालमत्ता (सामान शेतीची अवजारे व घरातील महत्वाचे साहित्य) सुरक्षित स्थळी हलविण्या बाबत, तसेच नदीपात्रामध्यये कोणीही उतरणार नाही याची दक्षता घेण्याबाबत कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी तलाठी यांना सूचना दिल्या आहेत. तसेच सकाळपासून तहसीलदार रामेश्वर गोरे पुर परिस्थिती बाबत गावांना भेटी देत आहेत. दरम्यान, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील पूर परिस्थितीचा आढाव घेत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत तालुक्यातील महसूल मंडळात झालेला पाऊस:
कंधार ६१, कुरुळा ८१.५, फुलवळ १८.५, पेठवडज ४७.५, उस्माननगर ५१.५, बारूळ ४७.५, दिग्रस बुद्रुक ८१.५.

Web Title: Nanded: Heavy rains in Kandhar taluka cut off communication with four villages, water entered 20 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.