Nanded: अतिवृष्टीने हातचं पिकं गेलं, त्यात कर्जाचे ओझं; आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:18 IST2025-10-03T12:15:56+5:302025-10-03T12:18:19+5:30
'आता पुढे कसं जगायचं?'; अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, युवा शेतकऱ्याचे दुःख; शेतीसह दुधाचा व्यवसायही करत होता, पण निसर्गापुढे झाला हतबल.

Nanded: अतिवृष्टीने हातचं पिकं गेलं, त्यात कर्जाचे ओझं; आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवलं
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): अतिवृष्टीमुळे पिकांची पूर्णपणे नासाडी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अर्धापूर तालुक्यातील येळेगाव (कारखाना) येथील एका २४ वर्षीय युवा शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
परमेश्वर नारायण कपाटे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती आहे आणि घरात तिघे भाऊ असा परिवार आहे. परमेश्वर हे शेतीसह दुधाचाही व्यवसाय करत होते. शुक्रवारपासून ते घरी दिसत नसल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध केली असता, घराच्या पाठीमागे असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
परमेश्वर यांच्या पॅन्टच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी माझ्या घरच्यांच्या कर्जाला कंटाळून, सततच्या पुरामुळे पूर्ण शेती गेली व आम्हाला सवलती नसल्यामुळे खूप विचार करत होतो. माझ्या भावाच्या मुलाचे शिक्षण कसे करू हे माझ्या मनात सतावत होते. तरी मी आत्महत्या करत आहे." या चिठ्ठीतून त्यांनी आपली हतबलता आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता व्यक्त केली आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर यांच्यावर खासगी व बँकेचेही कर्ज होते. अतिवृष्टीमुळे शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी आणि कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, या विवंचनेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. परमेश्वर यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावला गेला असून, या घटनेने प्रशासनाच्या दुर्लक्षावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.