- नामदेव बिचेवारबारड (नांदेड) : गुरुवार २५ डिसेंबरची पहाट मुदखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याला हादरवणारी ठरली. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्मघात केला. आई-वडील घरात फासावर लटकले, तर कुटुंबातील दोन तरण्याबांड पोरांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. या थरारक घटनेमागे पोलिस प्रथमदर्शनी आर्थिक संकट आणि कुटुंब प्रमुख वडिलांचा आजाराशी २५ वर्षांपासूनचा संघर्ष हे कारण सांगत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल. आई-वडील स्वत:हून फासावर लटकले की मुलांनी आधी त्यांना फासावर लटकवून नंतर स्वत:ही जीवनयात्रा संपविली, यावर पोलिस तपासाचा फोकस आहे. या घटनेमागे घातपात तर नाही ना, अशी शंकाही पोलिसांकडून तपासून पाहिली जात आहे.
मुदखेड तालुक्यातील जवळामुरार येथे गुरुवारी सकाळी ही भीषण घटना उघडकीस आली. रमेश होनाजी लखे (५२) आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे (४८) अशी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृत आई-वडिलांची नावे आहेत. तर त्यांच्या अविवाहित बजरंग (२२) आणि उमेश लखे (२६) या मुलांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानक क्षेत्रात ट्रॅकवर कटलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन मुलांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडले. त्यांची ओळख पटल्यानंतर गावातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली असता घरात आई-वडिलांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. एका आत्मघाती निर्णयाने संपूर्ण कुटुंबच संपून गेले.
जवळामुरार गावात एका छोट्या मातीच्या घरात रमेश लखे यांचे कुटुंब वास्तव्याला होते. पोलिसांनुसार, रमेश लखे गेल्या २५ वर्षांपासून हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली आहे. सध्याही त्यांच्यावर नांदेड येथे अधूनमधून औषधोपचार केले जात होते. २५ वर्षांपासूनच्या या आजाराने रमेश लखे चांगलेच ग्रस्त होते. शिवाय आर्थिकदृष्ट्याही कमकुवत झाले होते. या परिवाराकडे चार एकर शेती आहे. ती त्यांनी मक्ता बटाईने लावून दिली होती. राधाबाई लखे या शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. बजरंग हा नांदेडला दुकानात काम करायचा. तर उमेश मंडप डेकोरेशनचे काम करत होता. दोन भावांपैकी एक राजकीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ताही होता. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लखे यांच्या घराकडे धाव घेतली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
ना वाद, ना भांडण, ना शत्रुत्वगावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लखे कुटुंब गरीब पण अत्यंत शांत स्वभावाचे होते. कोणाशीही वाद, भांडण किंवा शत्रुत्व नव्हते. लहानसे मातीचे घर आणि साधे जीवन जगणारे हे कुटुंब अचानक अशारीतीने संपुष्टात येईल, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
निराशेचा अंधार इतका दाट होता का?आर्थिक परिस्थिती जेमतेम होती, पण निराशेचा अंधार इतका दाट होता का? की तरुण मुलांनी स्वत: ला संपवावं आणि आई-वडिलांनीही आत्महत्या करावी? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. एका शेतकरी कुटुंबाचा संपूर्ण अंत; आत्महत्या की घातपात? हे रहस्य पोलिस तपासातच पुढे येईल.
लोको पायलटने दोन्ही तरुणांना पाहिले...घटनेच्या रात्री दोन्ही भावंडांना घराबाहेर जाताना पाहिल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यानंतर नेमके काय घडले, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. परंतु, ज्या रेल्वेखाली सदर तरुण कटले, त्या रेल्वेच्या लोको पायलटने दोघांनीही पाहिले होते, असे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदन अहवालानंतरच चित्र स्पष्ट होईलजवळामुरार गावात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले. आई-वडील घरात तर त्यांची दोन मुले रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेत आढळली. वडिलांचा दीर्घ आजार, त्यातून बिघडलेली आर्थिक स्थिती, गरीब परिस्थिती ही कारणे प्रथमदर्शनी या घटनेमागे पुढे आली आहेत. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल. विविध अंगांनी या घटनेचा तपास करीत आहेत. आत्महत्या की घातपात या जनतेतील शंकेच्या दिशेनेही तपास केला जात आहे.-अबिनाश कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक, नांदेड.
Web Summary : A Nanded family of four, burdened by debt and illness, tragically ended their lives. The parents hanged themselves, while their two sons died by suicide on a railway track. Police are investigating all angles.
Web Summary : नांदेड में कर्ज़ और बीमारी से परेशान एक परिवार के चार सदस्यों ने आत्महत्या कर ली। माता-पिता ने फांसी लगा ली, जबकि दो बेटों ने रेलवे ट्रैक पर जान दे दी। पुलिस मामले की जांच कर रही है।