Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:44 IST2025-08-29T12:43:26+5:302025-08-29T12:44:44+5:30
भोकरमध्ये सुधा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या कार चालकाचा थरारक बचाव

Nanded: थरारक! सुधा नदीच्या पुरात कार घालणे जीवावर बेतला; चालकाला ग्रामस्थांनी वाचवले!
भोकर ( नांदेड) : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अशाच एका घटनेत, तामसा रस्त्यावरील सुधा नदीच्या पुलावर पुराचे पाणी वाहत असतानाही एका कार चालकाने पूल ओलांडण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, कार पुरात अडकून चालकाचा जीव धोक्यात आला होता. मात्र, परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून केलेल्या मदतीमुळे चालकाचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.
कार चालकाने केले धाडस, पण...
भोकरपासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या तामसा रस्त्यावर बोरगाव शिवारात सुधा नदीला पूर आला होता. नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते, तरीही तामसा येथील रहिवासी शिवाजी बालाजी शिंदे यांनी आपली कार (क्र. एमएच ३८ ५८०७) पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची कार पुलाच्या मध्यभागीच अडकली. कार पाण्यात अडकल्याचे लक्षात येताच, परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या धाडसाने वाचला जीव
या घटनेची माहिती मिळताच बोरगाव येथील परमेश्वर बोटलेवाड, लाला हुब्बेवाड, शिवाजी हुबेवाड, शिवाजी जाधव आणि साईनाथ जाधव यांसारख्या तरुणांनी कोणताही विचार न करता मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून, पुरात अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने कारला पुलावरच बांधून ठेवले, जेणेकरून ती वाहून जाणार नाही.
तीन तासांनी बाहेर काढली कार
सुधा नदीवरील पुराचे पाणी तब्बल तीन तासानंतर ओसरेल, त्यानंतर अडकलेली कार एका ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि मदतीमुळे चालकाचा जीव वाचल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, नागरिकांनी पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.