Nanded: बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; तळपत्या उन्हात अनुयायांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:00 IST2025-03-26T14:58:14+5:302025-03-26T15:00:02+5:30

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.

Nanded: Buddhagaya Mahabodhi Mahavihar handed over to Buddhists; Followers cry out in the scorching sun | Nanded: बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; तळपत्या उन्हात अनुयायांचा आक्रोश

Nanded: बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; तळपत्या उन्हात अनुयायांचा आक्रोश

नांदेड : बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीने देशभरात जोर धरला आहे. त्यासाठी मंगळवारी नांदेडात महाबोधी महाविहार मुक्ती महामोर्चा काढण्यात आला. तळपत्या उन्हात नवीन मोंढा मैदानावरुन निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातून हजारो अनुयायी सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. यावेळी अनुयायांनी बिहार सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मोर्चात वाहनावर महाविहार आणि तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या मोर्चाची सांगता झाली. 

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी देशभरात होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नांदेडातही मंगळवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ आहे. महाबोधी महाविहार हे जगाला शांतीचा संदेश आणि समतेचा उपदेश देणाऱ्या तथागत भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे पवित्र ठिकाण आहे. भारतीयच नव्हे तर जगाच्या पाठीवर असणाऱ्या समस्त बौद्ध अनुयायींसाठी महाबोधी महाविहार हे श्रद्धेचे स्थळ आहे. देशात कोणत्याही धर्माचे स्थळ असाे तिथे त्या-त्या धर्मीयांचा ताबा आढळून येतो. त्यानुसार तिथे पूजा-अर्चा, साधना, ध्यानधारणा केली जाते. परंतु महाबोधी महाविहार येथे हिंदू धर्मीयांचा ताबा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कर्मकांड केली जात आहेत. त्यामुळे भगवान बुद्धांच्या विचाराला हरताळ फासण्यात येत आहे. या संदर्भातील टेम्पल ॲक्ट १९४९ तत्काळ रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यासाठी नवीन मोंढा येथील मैदानावरून दुपारी मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तळपत्या उन्हात आयटीआय चौक, शिवाजीनगर, कलामंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ व्यासपीठ तयार करण्यात आले होते. व्यासपीठावरून बौद्ध भिक्खू समितीच्या सदस्यांची भाषणे झाली.

शुभ्र वस्त्र अन् शिस्तीत मोर्चा
पहाटेपासूनच जिल्हाभरातील बौद्ध अनुयायी नवीन मोंढा मैदानावर गर्दी करीत होते. शुभ्र वस्त्र अन् हातात पंचशील धम्म ध्वज घेऊन महिला आणि पुरुषांसह चिमुकलेही या मोर्चात सहभागी झाले होते. अनेक अनुयायी तर रात्रीच नांदेडात दाखल झाले होते. त्यांच्यासाठी अल्पोपहार आणि पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. हजारो अनुयायांनी शिस्तबद्धरीतीने हा मोर्चा काढला.

संयोजन समितीचे उत्कृष्ट नियोजन
महाबोधी महाविहार महामोर्चाच्या तयारीसाठी संयोजन समितीचे सदस्य गेल्या अनेक दिवसांपासून परिश्रम घेत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करुन जबाबदारींचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे संयोजन समितीच्या उत्कृष्ट नियोजनाचेही कौतुक होत आहे.

वाहतूक मार्गात बदल
दुपारी नवीन मोंढा येथून निघणाऱ्या मोर्चासाठी वाहतुकीचा खोळंबा होवू नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मोर्चाच्या समोर रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली होती.

Web Title: Nanded: Buddhagaya Mahabodhi Mahavihar handed over to Buddhists; Followers cry out in the scorching sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.