अर्धापूरच्या चविष्ट केळीवर युद्धाचं सावट; निर्यातीअभावी भाव पडले, लाखो रुपयांचा खर्च मातीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:15 IST2026-04-02T16:10:47+5:302026-04-02T16:15:01+5:30
अर्धापूर तालुक्यात केळीचे दर कोसळले; लाखो रुपयांचा खर्च मातीत, निर्यातीअभावी बाजारपेठ ओस.

अर्धापूरच्या चविष्ट केळीवर युद्धाचं सावट; निर्यातीअभावी भाव पडले, लाखो रुपयांचा खर्च मातीत
पार्डी (जि. नांदेड) : अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, ७० ते ८० टक्के क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. सध्या पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची केळी काढणीस आली आहे. मात्र, बाजारपेठेत केळीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता केळीच्या दरातील मोठी घसरण आणखी गंभीर समस्या ठरत आहे.
गतवर्षी मे महिन्यात लागवड केलेली केळी एप्रिल महिन्यात काढणीस आली असताना अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी केळीचे घड काढून ठेवले असले, तरी व्यापारी खरेदीकडे पाठ फिरवत असल्याने अनेक ठिकाणी केळी शेतातच पिकून जात आहेत. काही शेतकरी नाईलाजाने केळीचे घड कापून जनावरांना चारा म्हणून टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील केळी चविष्ट व स्वादिष्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र सध्या इराण-अमेरिका युद्धामुळे आखाती देशांमध्ये होणारी केळी निर्यात बंद झाली असून, याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. गतवर्षी मे महिन्यात केळीला २१०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र, यंदा तोच दर घसरून केवळ ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे.
भाव मिळत नसल्यामुळे घड टाकले जनावरांसमोर.
अर्धापूर तालुक्याच्या शेजारील गावातील दोन शेतकऱ्यांनी ४०० रुपये दर मिळत असल्याने चार-चार हजार काढणीस आलेले केळीचे घड जनावरांना कापून टाकले. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. गतवर्षी अर्धापूर तालुक्यातून आखाती देशांत लाखो टन केळीची निर्यात झाली होती. मात्र, यंदा काढणीच्या सुरुवातीपासूनच निर्यात थांबल्याने केळीचे दर अक्षरशः कोसळले असून, केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.