Nanded: आधीच कर्जाचा विळखा, त्यात हातचं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याने जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:13 IST2025-08-30T15:04:57+5:302025-08-30T15:13:31+5:30
सततच्या पावसाने पिकं वाहून गेल्याने मोठे नुकसान; कर्जफेड कशी करायची या विवंचनेत शेतकरी

Nanded: आधीच कर्जाचा विळखा, त्यात हातचं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याने जीवन संपवलं
- गोविंद कदम
लोहा ( नांदेड) : सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे आणि वाढते कर्ज यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या आर्थिक संकटाचा फटका रिसनगाव येथील तरुण शेतकरी सिध्देश्वर वाघमोडे (वय २९) याला बसला. नैराश्यग्रस्त होऊन त्यांनी ३० ऑगस्ट रोजी शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. आधीच कर्जबाजारी असल्याने रिसनगाव येथील वाघमोडे कुटुंबाची परिस्थिती बिकट झाली. त्यात शेतीमालाला बाजारभाव न मिळाल्याने आर्थिक संकट आणखीनच वाढले. या पार्श्वभूमीवर शेतकरी सिद्धेश्वर वाघमोडे यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,चार मूली, एक मूलगा असा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पीडित कुटुंबाला मदत द्या
दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करून वाघमोडे कुटुंबाला तातडीची मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.