नांदेड विमानतळाच्या नावात बदल होताच उडाला गोंधळ, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 09:21 IST2020-02-24T08:45:07+5:302020-02-24T09:21:23+5:30
विमानतळ नामांतराची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली.

नांदेड विमानतळाच्या नावात बदल होताच उडाला गोंधळ, पण...
मुंबई - नांदेडमधील श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज नागरी विमानतळावरील नावाची पाटी बदलण्यात आल्याने नांदेडमध्ये गोंधळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे श्री गुरू गोबिंद सिंह जी यांच्या नावाच्या जागी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशी पाटी लावण्यात आली होती. याबाबतची, माहिती समजताच तेथील शीख बांधवांनी विमानतळावर गर्दी केली होती.
विमानतळ नामांतराची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे, शीख बांधवांनी एकत्र येऊन यासंदर्भात आवाज उठवला. मात्र, विमानतळावर पोहोचल्यानंतर नाव बदलाच्या बातमीचा खुलासा झाला. त्यामुळे, सर्वांच्याच मनातील गोंधळ दूर झाला. एका चित्रपटाच्या शुटींगसाठी या विमानतळाचे नामांतर करण्यात आले होते. चित्रपटातील दृश्याची गरज म्हणून येथे नवीन नावाची पाटी लावण्यात आली होती. याबाबत शीख बांधवांना माहिती दिल्यानंतर, नवी पाटी काढून पुन्हा श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज यांच्या नावाची पाटी पूर्ववत करण्यात आली.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने 1958 साली नांदेडमधील हे विमानतळ बांधले. सन 1990च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एरलाइन्स व गोएरची उड्डाणे येथून होत असत. त्यानंतर, श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज नागरी विमानतळ या नावाने विमानतळाचं उद्घाटन ऑक्टोबर 2008 मध्ये तत्कालीन नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या विमानतळावरुन नुकतेच नांदेड ते मुंबई विमानसेवा सुरू झाली असून उडाण योजनतेही नांदेडचा समावेश केला आहे.