नांदेडमध्ये मोबाइल शॉपी चालकाची ६ लाखाची बॅग पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:09 IST2021-01-22T19:07:57+5:302021-01-22T19:09:12+5:30
ही घटना गुरुवारी रात्री वर्दळीचा भाग असलेल्या श्रीनगर भागात घडली.

नांदेडमध्ये मोबाइल शॉपी चालकाची ६ लाखाची बॅग पळवली
नांदेड : शहरात आयटीआय चौक परिसरात असलेल्या एका मोबाइल शॉपी चालकाची ६ लाख रुपये असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री वर्दळीचा भाग असलेल्या श्रीनगर भागात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आयटीआय चौक परिसरात मो. नाजीद हुसेन अहेमद हुसेन यांची मोबाइल शॉपी असून, ते नेहमीप्रमाणे गुरुवारी शॉप बंद करून ६ लाख रुपये असलेली बॅग घेऊन स्कूटीवरून चैतन्यनगर भागातील बीॲन्डसी कॉलनीत असलेल्या आपल्या घरी जात होते. दुचाकी घेऊन ते श्रीनगर भागात आलेले असताना रात्री १० वाजताच्या सुमारास पाठीमागून दोघे अज्ञात आले. यावेळी चोरट्याने मो. नाजीद हुसेन यांच्या खांद्यावर लटकविलेली बॅग हिसकावून पळ काढला. यावेळी मो. नाजीद हुसेन यांनी आरडाओरड केली; परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
या प्रकरणात मो. नाजीद हुसेन यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात तपास पोनि. अभिमन्यू सोळंके हे करीत आहेत. वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने व्यापा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शुक्रवारी या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत होती.