'एक-दोन प्रश्न सुटले अन् नेटवर्क गेले'; नांदेडच्या B.Ed CET परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:15 IST2026-03-27T14:13:50+5:302026-03-27T14:15:38+5:30
संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.

'एक-दोन प्रश्न सुटले अन् नेटवर्क गेले'; नांदेडच्या B.Ed CET परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी संतप्त
- सचिन मोहिते
नांदेड: शहरातील एकरा इंटरनॅशनल स्कूल परीक्षा केंद्रावर शुक्रवारी (दि. २७ मार्च २०२६) MAH-B.Ed CET-2026 परीक्षेदरम्यान नियोजनाचा मोठा बोजवारा उडाला. केंद्राची आसनक्षमता केवळ ३०० असताना तब्बल ६०० विद्यार्थ्यांना एकाच वेळी बोलावल्याने अर्ध्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
नेटवर्क अभावामुळे ऑनलाइन परीक्षेचा फज्जा
परीक्षेची वेळ सकाळी ११ ते १२:३० अशी असतानाही अनेक तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या नेटवर्क सुविधेचा केंद्रावर पूर्णतः अभाव होता. अनेक विद्यार्थ्यांना एक-दोन प्रश्न सोडवताच सर्व्हर डाऊन झाल्याने बाहेर थांबावे लागले. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आणि तांत्रिक बिघाड यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
व्यवस्थापनाचा अभाव आणि सावळा गोंधळ
केवळ तांत्रिक बिघाडच नाही, तर हॉल तिकीट तपासणी आणि ओळख पडताळणीसाठीही केंद्रावर पुरेशी यंत्रणा नव्हती. ओळख पडताळणीमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे मौल्यवान वेळ वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तर अपुऱ्या व्यवस्थेमुळे शैक्षणिक नुकसान झाले असून, राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (CET Cell) या प्रकरणाची दखल घेऊन फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.