विद्यार्थ्यांना ‘काबिल’ बनविण्यासाठी धडपडणारा ‘मास्तर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:40 IST2019-03-09T17:33:26+5:302019-03-09T17:40:42+5:30
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाचे दहावीच्या विद्यार्थ्यांना वासंतिक वर्गातून मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना ‘काबिल’ बनविण्यासाठी धडपडणारा ‘मास्तर’
- शरद वाघमारे
मालेगाव (जि. नांदेड) : काबील बनो, कामीयाबी झक मारके पिच्छे आयेगी, असं म्हणणारा थ्री इडियट्समधला रँचो आठवतो ना. पण इथे कुणी विद्यार्थी नाही. तर आपल्या विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाव. तो काबिल बनावा म्हणून एक शिक्षक रात्रदिवस धडपडतोय. शिवा कांबळे हे त्या शिक्षकाच नाव. जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक असलेल्या कांबळे मास्तरांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वासंतिक वर्ग सुरू केले आहेत. इतकच नाही, तर विद्यार्थ्यांना ज्ञानाच आकलन व्हावं म्हणून हा शिक्षक रात्रीला विद्यार्थ्यांबरोबरच शाळेत मुक्कामही करत आहे. या ज्ञानगुरूची कथा प्रेरणादायी ठरत आहे.
शिवा कांबळे यांनी आपला सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीतील व्याप बाजूला ठेऊन आपल्या आयुष्यातील दररोजचे बावीस तास विद्यार्थ्यांसाठी देणे सुरू केले. नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळ अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आपल्या शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी त्यांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वासंतिक वर्ग सुरू केले. हे वर्ग सायंकाळी चारपासून सुरू होऊन रात्री अकरा वाजेपर्यंत अगदी काटेकोरपणे चालतात. यात मुलांकडून अभ्यास करून घेतले जातात. या निवासी वर्गात रात्रीच्या वेळी फक्त मुले असले तरी, रात्रीला पाच-पाच मुलीचे गट तयार करून मुलीही अभ्यास करतात.
या मुलीच्या वर्गालाही शिवा कांबळे भेटी देऊन विविध विषयावर मार्गदर्शन करत असतात. रात्री अकरा ते पहाटे चार ही वेळ विश्रांतीची वेळ असून पहाटे चार ते सहापर्यंत मुले अभ्यास करतात. सहानंतर मुले घरी गेल्यानंतर शिवा कांबळे घरी जातात. बावीस तास विद्यार्थ्यांसोबत असूनही नेहमीप्रमाणे ते सव्वानऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत ते शाळेत असतात. रात्रीला मुलांसोबत बाकावर झोपून, खानावळीतले रात्रीचे जेवन घेऊन ते विद्यार्थ्यांसोबत असतात. हा ध्येयवेडा शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राबत आहे.
तीन तज्ज्ञ करतात मार्गदर्शन
शनिवारी दोन विषयांच्या सराव चाचणी परीक्षा घेण्यात येतात. रविवारी सकाळी दहापासून दोन वाजेपर्यंत वेळापत्रकानुसार तीन विषयांचे तीन तज्ज्ञ मार्गदर्शक कृतिपत्रिका कशी सोडवावी या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. असे विविध उपक्रम या शाळेत राबविले जातात.
विद्यार्थी विकासासाठी उपक्रम
शिवा कांबळे हे उपक्रमशील शिक्षक आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक शाळांवर वेगवेगळे उपक्रमही राबविले आहेत. सुंदर हस्ताक्षर प्रकल्प, द्या एक पुस्तक आमच्यासाठी, लेखक आपल्या भेटीला, लेखक-कवी दूरध्वनीवरून संवाद, माझा वर्ग सुंदर वर्ग आदी उपक्रम राबवून शिवा कांबळे नावाच्या कल्पक आणि उपक्रमशील शिक्षकाने विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी समर्पण भावनेतून प्रयत्न करीत आहेत. या मास्तरचे प्रेरणादायी काम मालेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
घरी अभ्यासाचे वातावरण नाही. घरी भावंडांचा गोंधळ, टी.व्ही.चा आवाज यामुळे अभ्यासात लक्ष लागायचे नाही आणि सलग अर्धा तासही आम्ही एका जागी बसून अभ्यास केला नाही. परंतु कांबळे सरांनी आमच्यासाठी हे निवासी वासंतिक वर्ग सुरू केल्यामुळे आता आम्ही तीन-तीन तास सरांसोबत अभ्यास करतो. आम्हाला याचा खूप फायदा झाला.
-अभिषेक बगाटे, विद्यार्थी, निवासी वासंतिक वर्ग.
शाळेच्या वेळात काम करणे हा कर्तव्याचा भाग असून शाळेच्या वेळानंतर शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी वेळ देणे हा समर्पणाचा भाग आहे. हे काम करताना मला प्रचंड आनंद वाटत असतो. आजपर्यंत मी शाळेच्या वेळाव्यतिरीक्त अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी विकासासाठी आणि गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले आहेत.
- शिवा कांबळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक, जि.प.हा.मालेगाव, ता.अधार्पूर, जि.नांदेड़