शेतातून येताना महिलेचा हात धरला; विनयभंग प्रकरणी आरोपीस १ वर्षाचा सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:35 IST2025-10-16T14:33:59+5:302025-10-16T14:35:01+5:30
विनयभंग व लैंगिक अत्याचारप्रकरणी १ वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

शेतातून येताना महिलेचा हात धरला; विनयभंग प्रकरणी आरोपीस १ वर्षाचा सश्रम कारावास
उमरी (जि. नांदेड) : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस १ वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा उमरी न्यायालयाने ठोठावली.
१ एप्रिल २०१९ रोजी फिर्यादी पीडित महिला शेतातील कामे आटोपून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरी परत जात होती. यावेळी आरोपी हा पाठीमागून येऊन तिचा हात धरला. घाबरलेल्या पीडित महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली व तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विविध कलमांन्वये उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता.
पोलिस जमादार गणपत सरोदे यांनी या प्रकरणाचा तपास करुन उमरी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अभियोग पक्षातर्फे सरकारी वकिलांनी एकूण चार साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. अभियोग पक्षातर्फे नोंदविण्यात आलेली साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून उमरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एस. कुलकर्णी यांनी आरोपी ज्ञानोबा ऊर्फ बाबू गंगाराम वहिंदे (रा. हंगीरगा) यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. निखिल मनोहर मगदूम यांनी बाजू मांडली व युक्तिवाद केला. त्यांना पोलिस जामदार बालाजी बोडके यांनी सहकार्य केले.