आई राजा उदे उदे!; चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ, माहूर गडावर दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:29 IST2026-03-19T19:29:19+5:302026-03-19T19:29:48+5:30
रेणुकादेवी चैत्र नवरात्र उत्सवास प्रारंभ; गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना आणि महाआरती

आई राजा उदे उदे!; चैत्र नवरात्रोत्सवास प्रारंभ, माहूर गडावर दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
माहूर (जि. नांदेड): महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर श्री रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (१९ मार्च) दुपारी साडेबारा वाजता विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण गड परिसर 'आई राजा उदे उदे'च्या जयघोषाने दणाणून गेला आहे.
सनईच्या सुरात महापूजा
उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे ६ वाजता प्रसिद्ध सनई वादक नितीन धुमाळ आणि संचाच्या सनई वादनाने महोत्सवाची सुरुवात झाली. पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी आणि समीर भोपी यांच्या हस्ते देवीला पंचामृत अभिषेक करून पिवळ्या रंगाचे पैठणी महावस्त्र आणि सुवर्णालंकार परिधान करण्यात आले. मुख्य गाभाऱ्यासह परिसरातील तुळजाभवानी, परशुराम आणि महालक्ष्मी मंदिरातही पारंपरिक पद्धतीने सप्तधान्यांची पेरणी करून पहिली माळ चढवण्यात आली.
मराठी नववर्षाचा उत्साह
मराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्र, विदर्भ आणि शेजारील आंध्र प्रदेशातून हजारो भाविकांनी गडावर गर्दी केली आहे. मंदिर विश्वस्तांच्या हस्ते निशाण चढवून गुढीची विधिवत पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर कुमारिका आणि सुवासिनींचे पूजन करण्यात आले. पुढील नऊ दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, गडावर भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.