महावितरण पिच्छा सोडेना! व्यक्ति मृत, मीटर काढून नेले तरीही १८०० रुपयांचे बिल धाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:45 IST2025-11-18T16:40:24+5:302025-11-18T16:45:01+5:30
ग्राहकाचा मृत्यू झाला तरीही वीजबिल घेणे सुरूच; ना मीटर, ना वीजजोडणी, घरही कुलुपबंद, तरीही वीजबिल कसे?

महावितरण पिच्छा सोडेना! व्यक्ति मृत, मीटर काढून नेले तरीही १८०० रुपयांचे बिल धाडले
हदगाव : वीज वितरण कंपनीचे अजब किस्से नेहमीच ऐकायला मिळतात. मनाठा येथील एका ग्राहकाचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. तरीही वीजबिल त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. त्यांचे घर कुलुपबंद असून घरातील मीटर, वीजजोडणीच्या वायर कंपनीने काढून नेल्या आहेत. कोणीही घरी राहत नाही तरीपण वीजबिल त्यांना सुरूच आहे.
मनाठा येथील तुकाराम राजाराम धारकर यांच्या नावावर क्रमांक ५६००००१६३८६० चे मीटर सुरू होते. त्यांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला. त्यांना तीन मुले आहेत. परंतु दोन नांदेडला राहतात तर एक मुलगा शेतात राहतो. तुकाराम धारकर हे पोस्टाच्या खात्यात नोकरीला होते. एप्रिल २०२५ मध्ये त्यांच्या नावावर असलेल्या मीटरचे भाडे बिल २८०० रुपये आले. ते मृत्यूच्या माघारी चर्चा नको म्हणून भरले गेले. त्यानंतर विद्युत कंपनीला वीजबिल बंद करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर त्या घरातील मीटर काढून नेले. वीजजोडणी काढून टाकली. मुलांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण काय आश्चर्य, २९ नोव्हेंबर रोजी त्यांचे नावावर १८०० रुपयांचे बिल येऊन धडकले आहे. यामुळे धारकर कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला.
महावितरणला कसे काय कळत नाही?
ग्राहकाचा मृत्यू २ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला. त्यानंतर मुलांनी मीटर बंद करण्यासाठी अर्ज केला. मृत्यूनंतर वडिलांच्या नावावर असलेले २८०० रुपये बिलही भरले. त्यानंतर विद्युत कंपनीने मीटर काढून नेले. वीजजोडणी तोडली आणि मग सात महिन्यानंतर १८०० रुपये बिल त्यांच्या नावावर आले. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या शेतातच ‘एमएसबी’ कार्यालय आहे. त्यामुळे या घरातील खडा न् खडा त्यांना माहीत आहे. तरीही त्यांचे नावावर बिल येत असून शेतकऱ्याचा मृत्यू झाला तरी वीजबिल त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही.